शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी संस्कृतचा पेपर ; परीक्षा रद्द करण्याची मनविसेची मागणी 

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून १९ फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत इयत्ता दहावीची संस्कृत विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे.

शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी संस्कृतचा पेपर ; परीक्षा रद्द करण्याची मनविसेची मागणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन-CBSE) छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंतीच्या दिवशी संस्कृत विषयाचा पेपर (Sanskrit Subject Paper) नियोजित केला आहे.मात्र, महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सुट्टी आहे. त्यामुळे सीबीएसईने 19 फेब्रुवारी रोजीचा पेपर रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (मनविसे) (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) करण्यात आली आहे.तसेच राज्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे (Office of the Commissioner of Education)सीबीएसई बोर्डाच्या पुणे विभागीय (Pune Division of CBSE Board)अधिकाऱ्यांना याबाबत पत्र देण्यात आले आहे.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून १९ फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत संस्कृत विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सीबीएसई बोर्डाने शासकीय सुट्टी असताना संस्कृत विषयाचा पेपर ठेवला आहे, मात्र, हा पेपर रद्द करावा. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पुणे विभागीय सीबीएससी बोर्डाचे संचालक राम वीर यांना देण्यात आले.यावेळी आशिष साबळे, ॲड सचिन पवार, रुपेश घोलप, सुनिल कदम,बाळासाहेब शिंगाडे, किर्ती माचरेकर आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात त्यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने अधिकृत सुट्टी जाहीर केलेली असताना सीबीएसई बोर्डाने राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधने अपेक्षित होते. सीबीएसई बोर्ड महाराष्ट्राच्या दैवताचा जाणीवपूर्वक अपमान करत आहे, अशी आमची भावना झाली आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारी रोजीची परीक्षा त्वरित रद्द करावी, असे सीबीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मनविसेचे प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी संस्कृत विषयाचा घेतला जाणारा पेपर रद्द करवा, अशी मागणी सीबीएसई बोर्डाकडे करण्यात आली आहे.तसेच राज्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण उपसंचालक डॉ.श्रीराम पानझडे यांनी सुद्धा शिवाजी महाराज  यांच्या जयंतीच्या दिवशी होणारी परीक्षा रद्द करावी, असे पत्र सीबीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांना पाठविले आहे.