SPPU : पात्र नसल्याचा शेरा दिल्यानंतर प्रभारी कुलसचिव पदी नियुक्ती का दिली..
पुढील आठ दिवसात अधिष्ठाता व कुलसचिव निवडी संदर्भात विद्यापीठाने घोषणा करावी, अन्यथा युवा सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही परिपत्रकाद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) कुलसचिव निवड प्रक्रियेवरून (Controversy over Registrar selection process) गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून मोठा वाद निर्माण झाला . मात्र, कुलसचिव पदासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीची निवड करून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव देणे अपेक्षित होते. मात्र, कुलसचिव पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून ज्या व्यक्तीला मुलाखत घेऊन कुलसचिव पदासाठी पात्र नसल्याचा शेरा विद्यापीठाने दिला त्याच व्यक्तीला विद्यापीठाने प्रभारी कुलसचिव पदाचा (Registrar-in-charge) पदभार दिला असल्याचा गंभीर आरोप युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav Joint Secretary of Yuva Sena) यांनी केला आहे. तसेच याबाबतचे निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना दिले आहे.
विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्ती होणाऱ्या संभाव्य उमेदवाराबाबत अनेक टीका झाल्यानंतर विद्यापीठाने याबाबत माजी न्यायाधीशांच्या मार्फत तक्रारदारांची सुनावणी घेतली होती. यामध्ये युवा सेनेचे कल्पेश यादव यांनी देखील त्यांची भूमिका मांडली होती. तक्रारदारांनी मांडलेल्या मतांनंतर संबंधित न्यायाधीशांनी विद्यापीठाकडे काय अहवाल सादर केला, याबाबत अजूनही खुलासा झालेला नाही, असेही कल्पेश यादव यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, विद्यापीठाने तात्काळ पूर्णवेळ प्रभारी कुलसचिव आणि अधिष्ठाता यांची नियुक्ती करावी. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा, मेसचा, सुरक्षिततेचा प्रश्नही गांभीर्याने घ्यावा तसेच पुढील आठ दिवसात अधिष्ठाता व कुलसचिव निवडी संदर्भात विद्यापीठाने घोषणा करावी, अन्यथा युवा सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे विद्यापीठाला देण्यात आला आहे.