सेट परीक्षा ऑफलाइनच होणार ; नोव्हेंबर अखेरीस परीक्षेची तारीख जाहीर करणार

सोमवारपासून सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर सेट परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.

सेट परीक्षा ऑफलाइनच होणार ; नोव्हेंबर अखेरीस परीक्षेची तारीख जाहीर करणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) घेतली जाणारी सेट परीक्षा ऑफलाइन (set exam offline) पद्धतीनेच होणार असून विद्यापीठातर्फे एक शेवटची ऑफलाइन परीक्षा आयोजित केली आहे. विद्यापीठातर्फे या परीक्षेचे वेळापत्रक नोव्हेंबर महिना अखेरीस (Exam schedule at the end of November) जाहीर केले जाणार आहे. सोमवारपासून (दि.२०) सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या मार्च किंवा एप्रिल (march or april) महिन्यात विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार की ऑफलाईन याबाबत शंका होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीच्या आदेशानुसार गठित केलेल्या समितीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत सर्वसाधारणपणे मार्च - एप्रिल  २०२४ मध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी. मात्र, त्यानंतरच्या पुढील सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे निश्चित करण्यात आले.

हेही वाचा : कोणत्या महाविद्यालयांचे रूपांतर होऊ शकते समूह विद्यापीठात : डॉ. शैलेन्द्र देवळाणकर

विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे नियोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा सराव करण्यास अवधी मिळणे गरजेचे आहे.त्यामुळे सध्या ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन केले जात आहे.या बैठकीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर,तत्कालीन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर ,डी.जी. कान्हेरे, मुंबईतील होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत, गोवा विद्यापीठाचे कौस्तुभ प्रोओलकर आदी उपस्थित होते.

विद्यापीठातर्फे सोमवारपासून पेपर सेटिंगचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर महिना अखेरीस परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर परीक्षा अर्जांची छाननी, हॉल तिकीट तयार करणे, आदी गोष्टींसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी सेट परीक्षा येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित केली जाणार असल्याची शक्यता आहे.
-----------------


विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीच्या आदेशानुसार गठित केलेल्या समितीच्या निर्णयानुसार विद्यापीठातर्फे सध्या ऑफलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. नोव्हेंबर महिना अखेरीस परीक्षेच्या तारखा घोषित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

-  डॉ.विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ