आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर, १४ फेब्रुवारीपासून पालकांना मॅसेज प्राप्त होणार

सोडत प्रक्रियेत प्रवेश मिळालेल्या पाल्यांच्या पालकांना १४ फेब्रुवारीपासून  त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर सक्त कारवाई करण्यात येणार असून, त्याची माहिती शिक्षण विभागाला कळविण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर, १४ फेब्रुवारीपासून पालकांना मॅसेज प्राप्त होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची (RTE Admission Process) सोडत जाहीर (RTE Lottery announced) करण्यात आली. या सोडत प्रक्रियेत प्रवेश मिळालेल्या पाल्यांच्या पालकांना १४ फेब्रुवारीपासून  त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर सक्त कारवाई करण्यात येणार असून, त्याची माहिती शिक्षण विभागाला कळविण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (Education Commissioner Sachindra Pratap Singh) यांनी केले आहे.

आरटीई प्रवेशाची ऑनलाइन लॉटरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेच्या (एससीईआरटी) कार्यालयात शिक्षण विभागाचे अधिकारी, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. आरटीई ऑनलाइन सोडतीसाठी नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्यांद्वारे क्रमांक काढले. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधक परिषदेचे संचालक राहुल रेखावार, योजना संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे आदी उपस्थित होते.

संपूर्ण आरटीई प्रवेश प्रक्रिया ही प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत आहे. आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या खासगी  शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेशित विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना देण्यात येते. यंदा या प्रवेश प्रक्रियासाठी राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमधील १ लाख ९ हजार १११ जागांसाठी ३ लाख ५ हजार ९६० अर्ज दाखल केले आहेत. 

--------------------------------

खासगी शाळांनी मुलांचे प्रवेश नाकारल्यास, संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे आरटई प्रवेशाचे प्रलोभन दाखविणाऱ्या एजंटांवरही नियमाने कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पालकांनी पुढे येत, संबंधित शाळा किंवा व्यक्तींची माहिती शिक्षण विभागाला द्यावी.
- सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त