वार्षिक परीक्षा बदलावरील चर्चा निष्फळ; SCERT संचालक भूमिकेवर ठाम
संचालक राहूल रेखाराव हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आणि शिक्षक संघटना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ही भेट निष्फळ ठरली.त्यामुळे हा प्रश्न आणखी काही दिवस चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील इयत्ता १ ली ते इयत्ता ९ च्या वार्षिक परीक्षा/ संकलित मूल्यमापन (PAT) परीक्षेसंदर्भात दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिध्द केलेले परीक्षेचे वेळापत्रक गैरसोयीचे असून शालेय निकाल लावण्यासंदर्भात शिक्षकांना अडचणी येणार आहेत. याकरिता पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (S.C.E.R.T.) संचालक राहुल रेखावार यांची गुरुवारी (दि.२०) भेट घेतली.मात्र, संचालक राहूल रेखावार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आणि शिक्षक संघटना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ही भेट निष्फळ ठरली.त्यामुळे हा प्रश्न आणखी काही दिवस चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले.
शिक्षण विभागाने १९ एप्रिल २०२५ पर्यंत वार्षिक परीक्षा/संकलित मूल्यमापन (PAT) परीक्षा घ्याव्यात. यासह पेपर तपासणीमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, शालेय कामकाज ,निकाल तयार करणे व जाहीर करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावर संचालक रेखाराव यांनी वरील बाबींचे खंडन करून नव्याने योग्य ते कारणे द्यावीत. जेणेकरून सदर प्रस्तावामध्ये दुरुस्त करण्यात अडचणी येणार नाहीत, असे सांगितले.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनीलभाऊ जगताप, शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष, हरिश्चंद्र गायकवाड, शिक्षक सेनेचे उर्दू विभागाचे राज्याध्यक्ष मुस्ताक पटेल , महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष नारायण शिंदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे जिल्हा प्राथमिकचे सरचिटणीस रणजित बोत्रे, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुजित जगताप ,पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष शिवाजी कामठे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राज मुजावर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्यासचिव भानुदास रिठे , पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव किशोर बोरसे ,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव विष्णुदास गावडे,पुणे शहर अध्यक्ष संदीप सातपुते,सहसचिव रूपाली आव्हाड , मुख्याध्यापिका शुभांगी सदनकर, भावना भतिजा, मुख्याध्यापक शशिकांत किंद्रे , बाळासाहेब पाटील, कविता मिंढे, सारंग पाटील आदी संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.