MPSC Exam : गर्भवती विद्यार्थीनीला परीक्षा केंद्रातच प्रसूती कळा, कन्येला दिला जन्म
पेपर सुरू होऊन काही मिनिटे होत नाही, तोच तिला प्रसूती कळा सुरू झाल्या ही बाब लक्षात येताच पर्यवेक्षकांनी पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी वर्गात धाव घेत घटनेचे गांभीर्य ओळखत त्वरित सदर विद्यार्थीनीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील एक गर्भवती असलेली विवाहित परीक्षार्थी अधिकारी होण्याची स्वप्न उराशी बांधून'एमपीएससी' (MPSC Exam 2024) परीक्षा देण्यासाठी परीक्षा (State Service Commission Joint Preliminary Examination) केंद्रात आली. पेपर सुरू होऊन काही मिनिटे होत नाही, तोच तिला प्रसूती कळा सुरू झाल्या ही बाब लक्षात येताच पर्यवेक्षकांनी पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी वर्गात धाव घेत घटनेचे गांभीर्य ओळखत त्वरित सदर विद्यार्थीनीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या गर्भवती महिलेने एका कन्येला रुग्णालयात जन्म दिला असून नवजात शिशू व माता दोन्ही सुखरूप आहेत.
राज्यसेवा आयोगाची संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी घेण्यात आली. मालेगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या युगंधरा गायकवाड व त्यांचे पती गोरख गायकवाड हे दाम्पत्य परीक्षा देण्यासाठी नाशिकला वेगवेगळ्या केंद्रांवर सकाळी दाखल झाले. युगंधरा या गर्भवती असल्याने त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ कार्तिक शेवाळे हा आला होता. त्याने बहिणीला आतमध्ये सोडल्यानंतर तो केंद्राबाहेर निघून गेला.
परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासांनंतर गायकवाड हिला प्रसूती कळा जाणवायला सुरूवात झाली. क्षणात त्यांना वेदना वाढल्या. त्यानंतर वर्गावर असलेल्या पर्यवेक्षकांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना बोलून आणि त्यांनी समयसूचकता दाखवून घटनेचे गांभिर्य ओळखून कोणताही विलंब न करता तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
प्रसूत मुलीच्या आईने मानले पोलिसांचे आभार
दोघेही परीक्षा देण्यासाठी नाशिकला आले होते. सरकारी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न असल्याने दोघांनी खूप मन लावून रात्रंदिवस अभ्यास केलेला होता. त्यामुळे युगंधरा हिने धाडस केले. पोलिसांनी वेळीच देवदूतासारखी धाव घेतल्याने माझी मुलगी व नात दोन्हीही सुखरूप राहिले, त्यांचे खूप-खूप आभार.