शिक्षकांसाठी ड्रेस कोड ; जिन्स, टी शर्टला बंदी , निर्णयाला शिक्षक , मुख्याध्यापकांचा विरोध

राज्यातील सर्व प्रकारच्या व्यवस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. 

शिक्षकांसाठी ड्रेस कोड ; जिन्स, टी शर्टला बंदी , निर्णयाला शिक्षक , मुख्याध्यापकांचा विरोध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सामान्यतः विद्यार्थ्यी हे अनुकरणप्रणित असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभणीय, व्यवस्थित नसेल तर त्याचा अप्रत्यक्ष एकंदरीत परिणाम अध्यपन करणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वावर (Student personality) होतो.  ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभाागाने (Department of Education) राज्यातील सर्व प्रकारच्या व्यवस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी नवीन ड्रेस कोड (New dress code) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील काळात ड्रेस कोड मुद्दा वादात संपडण्याची शक्यता आहे. कारण शिक्षक व मुख्याध्यापकांकडून या निर्णयास विरोध केला जात आहे.  

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्यांक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुदानित शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. जनसामान्यांमध्ये त्यांच्याकडे पाहाण्याचा गुरुचा दर्जा असतो. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिले जाते. वरील सर्व विषयांना अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला शिक्षकांकडून विरोध केला जात आहे. 

शिक्षकांनी गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम/ चित्रे असलेले पेहराव करू नये.तसेच शिक्षकांनी जिन्स व टीशर्ट वा वापर शाळेमध्ये करू नये,असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.त्याचाप्रमाणे  पुरूष व महिला शिक्षिका यांच्या करिता परिधान करण्याचा पेहराव कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे,असे म्हणत असतानाच पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टाचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा,असा विरोधाभासही अध्यादेशात आहे. 

शासनाच्या मार्गदर्शक सुचना 

सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी. शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा. पुरुष व महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे. पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा. महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (उदा. पुरुषांनी शूज) यांचा वापर करावा. स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहतील. वैद्यकीय कारण असेल तर पुरुपांना/महिला शिक्षकांना बूट (शुज) वापरण्यातून सवलत देण्यात यावी.

_____________________________________________

शिक्षकांना ड्रेस कोड देण्याचा निर्णय योग्य असला तरी कोणत्या पध्दतीचा किंवा रंगाचा पोषाख असावा इतपर्यंत खोलवर जाण्याची आवश्यकता नव्हती.प्रत्येक भू भागानुसार पोषाख असणे अपेक्षित होते. त्यामुळे या निर्णयाला विरोध होऊ शकतो.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ 

-----------------

शासनाने ड्रेस कोडचा घेतलेला निर्णय अन्यायकारण आहे, किंवा लादला जात आहे. लादला गेला तर त्यातून त्यांना आऊटपूट काहीच मिळणार नाही. या काही सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा नाहीत. शिक्षक वर्ग किंवा महिला शिक्षक वर्ग यांना ड्रेस कोड बंधनकारण करणे योग्य नाही. या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध केला जाणार आहे. 

नारायण शिंदे,  अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे