डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंचे नाव गुलदस्त्यातच ; मुलाखतीला 12 दिवस झाले

काही दिवसांपूर्वी विजय फुलारी यांचे नाव आघाडीवर होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंचे नाव गुलदस्त्यातच  ; मुलाखतीला 12 दिवस झाले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलगुरू (vc ) पदी कोणाची वर्णी लागणार याबाबतची उत्कंठा ताणली गेली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित विषयाचे प्राध्यापक डॉ.विलास खरात यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.त्यामुळे कुलगुरू पदाची माळ डॉ.विलास खरात ,डॉ.विजय फुलारी की डॉ.संजय ढोले यांच्या गळ्यात पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.मात्र,काही दिवसांपूर्वी फुलारी यांचे नाव आघाडीवर होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ.विलास खरात डॉ. संजय ढोले आणि कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी,ज्योती जाधव तसेच प्रा.राजेंद्र काकडे या अंतिम पाच उमेदवारांमधून एकाची निवड कुलगुरू पदी केली जाणार हे निश्चित झाले होते.नवीन वर्षात 4 जानेवारी रोजी सायंकाळी सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.मात्र, त्यानंतर 10 ते 11 दिवसांचा कालावधी उलटला तरीही कुलगुरू पदाची घोषणा झाली नाही.त्यामुळे आणखी किती दिवस कुलगुरूंचे नाव गुलदस्त्यात ठेवले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.तसेच  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखती 11 जानेवारी रोजी पार पडल्या असून त्यातून डॉ. मिलिंद बाराहाते, एम.एस.महाजन, वाणी लातूरकर, रामचंद्र माठाळकर आणि राजेश गच्छे या पाच जणांची निवड अंतिम मुलाखतीसाठी केली आहे.त्याचाप्रमाणे येत्या 29 जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखती मुलाखती घेतल्या जाणार आहेत.त्यामुळे या तीनही विद्यापीठांच्या कुलगुरू पदावरून चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात रंगली आहे.