'एमपीएससी'ने परीक्षा पुढे ढकलल्या, नव्या वेळापत्रकानुसार आता 'या' तारखांना होणार परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्या वेळापत्रकानुसार आता या परीक्षा २७, २८ आणि २९ मे रोजी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तब्बल एक महिना अभ्यास करण्यासाठी मिळणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी पुणे आणि संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांकडून आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आल्याचे पाहायला मिळत आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकात म्हटले की, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या 318 उमेदवारांना राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पूर्व तयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यामुळे दिनांक 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांनी आयोगास दिलेली निवेदने प्राप्त झाली आहेत. उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसेच इतर सर्व बाबींचा विचार करून प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 27, 28 आणि 29 मे, 2025 या कालावधीत घेण्यात येईल. तसेच आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रस्तुत बदल हा एकवेळची अपवादात्मक बाब म्हणून आयोगाकडून सदर निर्णय घेण्यात आला आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थी राज्यातील विद्यार्थी नेहमीच नाराज असल्याचे चित्र आहे. अशातच राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलावी आणि एकत्रित परीक्षेच्या पीएसआय, एसटीआय, एएसओ, एसआर या पदांमध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एमपीएससी विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीने परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.