बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हॉल तिकीट या दिवशी मिळणार 

हॉल तिकीटसाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हॉल तिकीट या दिवशी मिळणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

HSC Exams Hall Ticket : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी /मार्च 2024 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे हॉल तिकीट (Hall Ticket for 12th Exams)ऑनलाइन पद्धतीने येत्या 22 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले हॉल तिकीट प्राप्त करू शकतात.हॉल तिकीटसाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी/ मार्च महिन्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठी ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

हेही वाचा : वयाच्या 21व्या वर्षीच विनायकने गाजवलं एमपीएससीचं मैदान ; आधी उपशिक्षण अधिकारी , आता राज्यात प्रथम

राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट  करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हॉल तिकीट ओपन करताना काही त्रुटी आढळून आल्यास हॉल तिकीट गुगल क्रोमा मध्ये ओपन करावे. हॉल तिकीट विद्यार्थ्यांना देताना त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये. तसेच हॉल तिकीटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉल तिकिटामध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. हॉल तिकिटावरील फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव यासंदर्भातील दुरुस्ती शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी.

हॉल तिकिटावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक संबंधित शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा हॉल तिकीट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्याकडे हॉल तिकीट द्यावे, असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.