SPPU NEWS : वादग्रस्त नाटकाचा वाद पुन्हा पेटणार ? ; अधिसभेत मांडणार 'त्या' व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या निषेधाचा प्रस्ताव 

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत काही सदस्य एका विशिष्ट धर्माच्या देवतांच्या नावाने घोषणा देत आणि त्या धर्माचे द्योतक असलेली भगवी उपरणे परिधान करून बैठकीत आली होती.ही बाब राज्यघटनेचे तसेच महाराष्ट्र शासनाच्या सदर सूचनांचे उल्लंघन करणारी आहे.

SPPU NEWS : वादग्रस्त नाटकाचा वाद पुन्हा पेटणार ?  ; अधिसभेत मांडणार 'त्या' व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या निषेधाचा प्रस्ताव 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रात (Fine Arts Centre)सादर झालेल्या वादग्रस्त नाटकाचा विषय अजूनही मिटला नसून या नाटकाचे पडसाद आता अधिसभेत उमटणार असल्याचे दिसून येत आहे.कारण विद्यापीठाच्या आधिसभा सदस्यांनी (University Senate Member) यावर काही प्रस्ताव सादर केले असून त्यात व्यवस्थान परिषद सदस्यांनी आपल्या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी,अन्यथा ही आधिसभा या सदस्यांचा निषेध करते,असा प्रस्ताव अधिसभा सदस्य डॉ.हर्ष जगझाप ( Senate Member Dr. Harsh Jagzap)यांच्याकडून अधिसभेत मंजूरीसाठी सादर केला जाणार आहे.तसेच कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील असा मजकूर नाटकात नसेल यांची खात्री संबंधित प्राध्यापकांनी करून घ्यावी,आशा आशयाचा प्रस्तावही सादर केला जाणार असल्याने ललित कला केंद्रातील वादग्रस्त नाटकाचा (Controversial plays at the Fine Arts Centre) वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात सादर करण्यात आलेल्या नाटकामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. विद्यापीठातील संबंधित प्राध्यापकावर कारवाई करावी,अशी मागणी विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. एवढेच नाही तर काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी सुध्दा या घटनेनंतर  विद्यापीठाच्या आवारात व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू होण्यापूर्वी प्रभू श्री रामाच्या घोषणा देत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केला. यावर आक्षेप घेणारा प्रस्ताव हर्ष जगझाप यांनी अधिसभेत सादर करण्यासाठी विद्यापीठाकडे दिला असून तो अधिसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत छापण्यात आला आहे.मात्र, यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम २८ (१) नुसार शासनाच्या अनुदानावर चालणाऱ्या अल्पसंख्यांक संस्था सोडता कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मिक सूचना न देण्याचे बंधन घातले गेले आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे कार्यक्रम अथवा पूजाअर्चा साजरे करण्यावर निर्बंध घालणाऱ्या सूचना महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केल्या आहेत.असे असतानाही दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत काही सदस्य एका विशिष्ट धर्माच्या देवतांच्या नावाने घोषणा देत आणि त्या धर्माचे द्योतक असलेली भगवी उपरणे परिधान करून बैठकीत आली होती.ही बाब राज्यघटनेचे तसेच महाराष्ट्र शासनाच्या सदर सूचनांचे उल्लंघन करणारी आहे.कोणतेही विद्यापीठ हे समाजाच्या सर्व घटकांसाठी चालविलेले असल्याकारणाने व्यवस्थापन परिषदेसारख्या विद्यापीठाच्या अत्यंत महत्वाच्या अधिकार मंडळाच्या सदस्यांनी केलेले हे कृत्य विद्यापीठाच्या समाजातील प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला बाधा पोहचविणारे आहे.सबब, ही आधिसभा असा ठराव करते की, ज्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी अशा प्रकारच्या कृतीमध्ये सहभाग घेतला नाही. त्यांनी विद्यापीठाची प्रतिष्ठा जपण्यासाठी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचे जाहीर आभार मानते.तसेच,ज्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी हे कृत्य केले आहे. त्यांनी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करावी, अन्यतः ही अधिसभा या सदस्यांचा जाहीर निषेध करते, असा डॉ.हर्ष जगझाप यांचा प्रस्ताव आहे. 

दरम्यान, विद्यापीठ हे उच्च शिक्षण घेणाऱ्या तसेच इतरही विद्यार्थ्यांसाठी विद्येचे मंदिर आहे. त्याचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यापीठातील ललितकला केंद्रात "जब वुई मेट" या नाट्य सादरीकरणादरम्यान नाटकातील संहितेमुळे जी गडबड झालेली होती. तशा प्रकाराची पुनरावृत्ती टाळली जावी. त्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा असो किंवा इतर प्रहसन सादरीकरण असो, विद्यापीठात तसेच विद्यापीठाच्या ललितकला केंद्रात सादर केली जाणारी संहिता संबंधित प्राध्यापकांनी (ललितकलाचे विभाग प्रमुख किंवा त्या त्या गटास दिलेले मेंटॉर प्राध्यापक) तपासावी. त्यात अश्लील वर्तन, अश्लील भाषा, अश्लील हावभाव नसावेत, तसेच त्यात कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील असा मजकूरही नसावा याची खात्री संबंधित प्राध्यापकांनी करुन घ्यावी. यासाठी संबंधित विभागातील प्राध्यापक जबाबदार असावा. अशी शिफारस ही अधिसभा संबंधित अधिकार मंडळास करत आहे,असा डॉ.अपर्णा लळिंगकर यांचा प्रस्ताव आहे.