विद्यापीठच्या 40 विभागाच्या चाव्या केवळ 11 प्राध्यापकांकडे 

काही विभाग प्रमुखांकडे चार चार विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विद्यापीठच्या 40 विभागाच्या चाव्या केवळ 11 प्राध्यापकांकडे 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) 55 विभाग आणि 28 केंद्र अशा एकूण 83 शैक्षणिक आस्थापना आहेत.त्यातील सुमारे 30 विभाग आणि केंद्र यांचा विभाग प्रमुख, संचालक, समन्वयक पदांचा कार्यभार केवळ 7 प्राध्यापकांकडे सोपवण्यात आला आहे. तसेच काही विभाग प्रमुखांकडे चार चार विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी नवीन नेतृत्व मिळण्याच्या प्रक्रियेला खीळ बसत आहे. त्यामुळे एका व्यक्तीस एकच पद देण्याचा धोरणात्मक निर्णय विद्यापीठाने घ्यावा,अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून करण्यात आली आहे.   

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या 23 मार्च रोजी होणार आहे.त्यात विविध प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. त्यात या प्रस्तावाचा समावेश आहे.विद्यापीठात 200 हून अधिक अध्यापक असताना व त्यापैकी 10 ते 15 वर्षांचा अनुभव असणारे अध्यापक असताना बऱ्याचशा विभाग व केंद्रात उपलब्ध असताना त्यांना डावलून सुमारे 11 अध्यापकांकडे 40 विभागांचा पदभार सोपवण्यात आला आहे. परंतु, यामुळे अनेकांना दिलेल्या जबाबदारीस न्याय देणे शक्य होत नाही.त्याचा विद्यापीठाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.असे केल्याने विद्यापीठात काही व्यक्तीकडे सत्तेचे केंद्रीकरण होत असून ही विद्यापीठाच्या प्रगतीस घातक आहे, 

विद्यापीठात प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी विद्यापीठात झालेले हे सत्तेचे केंद्रीकरण थांबवावे आणि विद्यापीठातील प्रत्येक शैक्षणिक विभाग व केंद्राच्या प्रमुख पदावर जास्तीत जास्त एक पूर्णवेळ पद द्यावे, अशी मागणी अधिसभा सदस्य हर्ष जगझाप यांनी केली आहे.