मतदान वाढीसाठी विद्यार्थ्यांचा हातभार; व्हिडीओ, पत्रलेखनातून मतदारांना साद.. 

शिक्षण संचालनालयाने (योजना) शालेय विद्यार्थी व नवसाक्षर यांच्यासाठी व्हिडिओ निर्मिती आणि कौटुंबिक पत्रलेखन हे उपक्रम आयोजित केले आहेत.

मतदान वाढीसाठी विद्यार्थ्यांचा हातभार; व्हिडीओ, पत्रलेखनातून मतदारांना साद.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे (Maharashtra Assembly Elections 2024) राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्यातच शिक्षण संचालनालयाने (योजना) (Directorate of Education) शालेय विद्यार्थी व नवसाक्षर यांच्यासाठी व्हिडिओ निर्मिती आणि कौटुंबिक पत्रलेखन हे उपक्रम (Video production and family letter writing activities) आयोजित केले आहेत. या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याची साद घालण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान वाढीसाठी विद्यार्थ्यांचा हातभार लागणार आहे. 

या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा योजना शिक्षण संचलनालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कौटुंबिक पत्रलेखन आणि व्हिडिओ निर्मितीद्वारे अनोखा उपक्रम राज्यात राबविण्यासाठी सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. 'स्वीप' मार्फत यासाठी शिक्षण विभागाला याआधीच निर्देश देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात कमी मतदान झाल्याने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांच्यासह सर्व अधिकार्‍यांना मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शालेय विद्यार्थी व नव साक्षर यांनी या उपक्रमात मतदानाचे महत्त्व पत्रलेखन आणि व्हिडीओच्या माध्यमातून पटवून देणे अपेक्षित आहे. याबाबत आचारसंहिताचे उल्लंघन होणार नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवसाक्षरांसह इयत्ता पाचवी ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांनी कौटुंबिक पत्रलेखन व व्हिडिओ तयार करून सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. शाळा, तालुका, जिल्हास्तरावर या दोन्ही उपक्रमांत सर्वोत्कृष्ट प्रत्येकी पाच पत्रे आणि व्हिडिओ निर्मितीसाठी प्रशस्त पत्रे निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर वितरित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.