परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती; ३० जानेवारीपर्यंत करा अर्ज
राज्य शासनाकडून परदेशी शिक्षणासाठी भटक्या आणि विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीला पात्र ठरण्यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्या जातात.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य शासनाकडून परदेशी शिक्षणासाठी (Scholarships for studying abroad) भटक्या आणि विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीला पात्र ठरण्यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात (Application process begins) झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३० जानेवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
राज्य सरकारने शिष्यवृत्तीसाठी काही निकष लागू केले आहेत. विद्यार्थी ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणार आहेत ती परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत २०० क्रमांकाच्या आतली असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग आणि खुल्या प्रवर्गातील ८ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाच परदेशात जाऊन शिक्षण घेता येणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणारी पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
परदेशात शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची वैशिष्ट्य
परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणांची पारख व्हावी व त्याला संधी मिळावी, या हेतूने परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे. या शिष्यवृत्तींतर्गत विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम विद्यार्थ्यांना येण्यात येते. याशिवाय विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता, परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर परत मायदेशी येतानाचा विमान खर्च देखील या शिष्यवृत्तीद्वारे देण्यात येतो.