UP च्या धर्तीवर पोलीस भरतीसाठी वय वैधता वाढवणार का ? ; गृह विभाग काय निर्णय घेणार...

उत्तर प्रदेश सरकारकडून पोलीस भरतीच्या सर्व उमेदवारांना वय मर्यादेमध्ये तीन वर्षाची सुट देण्यात आली होती. तेवढी नाही पण किमान ३१ मार्च २०२४ पर्यंत तरी सुट देण्यात यावी.

UP च्या धर्तीवर पोलीस भरतीसाठी वय वैधता वाढवणार का ? ; गृह विभाग काय निर्णय घेणार...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात पोलीस भरतीत (Maharashtra Police Recruitment) वय वाढ आदेशाची वैधता 31 मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याच्या या पत्राला स्पर्धा परीक्षा समन्वय समिती (Competitive Examination Coordination Committee) यांनी रिट्विट केल्याने त्याला महत्त प्राप्त झाले आहे. 

उत्तर प्रदेश सरकारकडून पोलीस भरतीच्या सर्व उमेदवारांना वय मर्यादेमध्ये तीन वर्षाची सुट देण्यात आली होती. तेवढी नाही पण किमान ३१ मार्च २०२४ पर्यंत तरी सुट देण्यात यावी, अशी मागणी आता राज्यातील पोलीस भरतीचे उमेदवार करताना दिसत आहेत. 

येत्या ३ मार्च २०२३ रोजी सामान्य प्रशासन विभाग मार्फत जीआरची वैधता ३१ डिसेंबर २०२३ होती.  त्यात वाढ करून ३१ मार्च २०२४ करण्यात यावी. वयोमर्यादा ओलांडल्यामुळे व मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काढायला विलंब होत आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलून मदत करावी. मागील ३ मार्च २०२३ च्या सामान्य प्रशासन विभागामार्फत २ वर्ष कमाल वयोमर्यादा वाढून देण्यात आली होती. त्या GR नुसार पोलीस भरती ३१ डिसेंबर २०२३ च्या आत अपेक्षित होती. आपण पोलीस शिपाई भरती २०२२-२३ ची राबवत आहे. त्यानुसार वय गणना २०२१-२२-२३ या वर्षातील करण्यात यावी किंवा २०२१-२२-२३ या वर्षात वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना एक संधी देण्यात यावी.

सन २०१९ पासून बँडपथक व कारागृह पोलीस भरती अद्याप झालेली नाही, अशा वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना या भरतीला संधी देण्यात यावी. २०२४ मध्ये छत्तीसगड मध्ये ५ वर्ष, राजस्थान मध्ये ४ वर्ष, उत्तरप्रदेश तसेच केंद्रीय बोर्ड यांनी ३ वर्ष वय वाढवून दिले आहे. आम्ही फक्त ३१ मार्च २०२४ पर्यंत वय वाढवून देण्याची मागणी करत आहोत. आपण विधानसभेत भरती करणाऱ्या एकाही मुलाचे नुकसान होऊ देणार नाही,असा शब्द दिला असल्याची आठवण उमेदवारांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करुन दिली आहे. 

ज्या मुलांसाठी भरती निघाली आहे. त्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना पोलीस होण्यासाठी सरकारने एक संधी द्यावी, असे, या पत्रात नमुद करण्यात आले आहे.