अस्मा इन्स्टिटयूटला विद्यापीठाची नोटीस;एमबीएच्या विद्यार्थ्यांना लुटले,गुन्हा दाखल

या प्रकरणात दोषी असलेल्या ASMA इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट आणि पुणे इन्स्टिट्युट ऑफ बिजनेस सायन्स (PIBS) या संस्थेचे संचालक असलेले प्रा. गणेश तन्नू आणि प्रा. अरिंदम घोष यांच्यावर कारवाई करावी.

अस्मा इन्स्टिटयूटला विद्यापीठाची नोटीस;एमबीएच्या विद्यार्थ्यांना लुटले,गुन्हा दाखल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 शास्त्री एज्युकेशन फाउंडेशन (Shastri Education Foundation)अंतर्गत चालणाऱ्या अस्मा ( ASMA Institute of Management) या इन्स्टिटयूटने एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस (Show cause notice issued by Savitribai Phule Pune University)बजावली आहे. त्याचप्रमाणे इन्स्टिटयूटमधील विद्यार्थीनी केलेल्या तक्रारीनुसार अस्माच्या माध्यमातून त्रयस्तपणे इन्स्टिटयूट चालवणाऱ्या संचालकावर गुन्हा दाखल ( A case has been filed against the director)करण्यात आला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक, शैक्षणिक शोषण करणाऱ्या व विद्यार्थीनींची छेड काढणाऱ्या इन्स्टिटयूटच्या संचालकावर व इन्स्टिटयूटवर काय कारवाई होणार ? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
 
'एमबीएच्या विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा ; लग्न न करण्याचा बॉण्ड, 30 पैकी 29 विद्यार्थ्यांना बोगस कॉलेजने केले नापास' या मथळ्याखाली सर्व प्रथम 16 मार्च रोजी  'एज्युवार्ता'ने बातमी प्रसिध्द करून या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रकरणी संबंधित संस्थेसमोर आंदोलनही केले.

शुल्क नियमन समितीने निर्धारित केलेले शुल्क ६५ हजार रुपये शुल्क निर्धारित केलेले असताना इन्स्टिटयूटने विद्यार्थ्यांकडून दोन वर्षाचे ४,५०,००० लाख रुपये एवढे शुल्क आकारले.अतिरिक्त शुल्क आकारून सुद्धा प्रत्यक्षात या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात नाही.महाविद्यालयाने या अभ्यासक्रमासाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करून हिंजवडी येथे या अभ्यासक्रमाचे लेक्चर्स घेतले.आस्मा संस्थेच्या माध्यमातून इंटर्नशीप आणि नोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना गंडा घालण्याचा प्रकार घडला.विद्यार्थ्यांनी पोलिसांबरोबरच विद्यापीठाकडे सुध्दा या प्रकरणी तक्रार दिली आहे.त्यावर विद्यापीठाने संबंधित संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेल्या ASMA इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट आणि पुणे इन्स्टिट्युट ऑफ बिजनेस सायन्स (PIBS) या संस्थेचे संचालक असलेले प्रा. गणेश तन्नू आणि प्रा. अरिंदम घोष यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. 

----------------------------------------

अस्मा या संस्थेबाबत काही विद्यार्थी तक्रार घेऊन आले होते.त्यांची लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ संबंधित संस्थेला विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीच्या मुद्याला अनुसरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संस्थेचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. 

- डॉ.पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे