PRN BLOCK : विद्यापीठ घेणार ८८ हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा;  दोन दिवसात येणार परीक्षेबाबत स्पष्टता 

नेमक्या कोणत्या वर्षांपासूनच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल,या विद्यार्थ्यांची परीक्षा केव्हा घेतली जाईल, विद्यार्थ्याला परीक्षेची संधी हवी असेल तर प्राचार्याच्या शिफारशीचे पत्र सादर करावे लागणार  का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. 

PRN BLOCK : विद्यापीठ घेणार ८८ हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा;  दोन दिवसात येणार परीक्षेबाबत स्पष्टता 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) सत्र पूर्तता न झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या दोन संधी (Students who do not complete the session have two chances to take the exam) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात त्या संदर्भातील स्पष्टता येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे (Pune University exam department) या संदर्भातील परिपत्रक प्रसिध्द केले जाणार आहे.त्यामुळे नेमक्या कोणत्या वर्षांपासूनच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल,या विद्यार्थ्यांची परीक्षा केव्हा घेतली जाईल, विद्यार्थ्याला परीक्षेची संधी हवी असेल तर प्राचार्याच्या शिफारशीचे पत्र सादर करावे लागणार का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. 

हेही वाचा : पीआरएन ब्लॉकमूळे विद्यार्थी संतप्त ; २०१९ च्या पत्राने घातला गोंधळ

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यामधील तब्बल ८८ हजार ३३२ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यासंदर्भातील तयारी केली असून नियमांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तब्बल ४० वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. विद्यापीठाने २०१३ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना सुध्दा परीक्षेची संधी देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे बीएस्सी च्या ७ हजार ९८६ विद्यार्थ्यांना, बीए च्या ४१ हजार, बी.कॉम.च्या ३१ हजार २८८, बी.बी.ए च्या   १ हजार २२९ , एम. कॉम च्या २ हजार ५१५ तर एलएलबीच्या ३९० विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळाल्यामुळे फायदा होऊ शकतो.

एज्युवार्ता फॉलो अप: Breaking News : त्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले

कोणत्या वर्षांपासूनच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळेल याबाबत सध्या स्पष्टता नसली तरी विद्यापीठाकडून पूर्वी २०१३-१४ पासूनच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्याबाबत विचार केला जात होता. मात्र, आता २०११ पासूनच्या विद्यार्थ्यांना यात सामावून घेण्याबाबत विद्यापीठ सकारात्मक आहे. या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कुलगुरू कार्यालयाकडे स्वाक्षरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात सत्र पूर्तता पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज केव्हापासून भरता येतील, त्यांची परीक्षा केव्हा होईल,याबाबतचे उत्तर मिळणार आहे.

पीआरएन ब्लॉक झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेची चिंता आहे. तसेच परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ का दिली गेली नाही,असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. मात्र, प्रत्येक विद्यार्थ्यांचा केस टू केस अभ्यास करून कोणत्या विद्यार्थ्यांना अंतिम पूर्व व अंतिम वर्षांची परीक्षा देता येईल,या बाबत विद्यापीठाकडून नियमावली तयार केली जाणार आहे. तसेच विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीच्या माध्यमातून सर्व गोष्टी तपासून घेतल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ द्यावा लागणार आहे. परिणामी या विद्यार्थ्यांची परीक्षानंतर घेतली जाणार आहे,असे  विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
------------------------------------

सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना नियमात बसून दिलासा देण्याबाबतची कार्यवाही विद्यापीठाकडून सुरू आहे. विद्यापीठाकडून लवकरच या संदर्भातील सविस्तर परिपत्रक प्रसिध्द केले जाणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दोन परीक्षा देऊन अपूर्ण राहिलेली पदवी पूर्ण करता येईल.

 - डॉ. महेश ककडे,संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ