युवांची एमटेक अभ्यासक्रमाकडे पाठ; दर तीनपैकी दोन जागा रिक्त

बी.टेक पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पगारात आणि एम.टेक केल्यानंतर मिळणाऱ्या पगारात फारसा फरक नाही, यामुळे विद्यार्थी  पदव्युत्तर शिक्षणाकडे वळत नाहीत. शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यास इच्छुक असलेले विद्यार्थीच एमटेक अभ्यासक्रम घेण्याचा विचार करतात.

युवांची एमटेक अभ्यासक्रमाकडे पाठ; दर तीनपैकी दोन जागा रिक्त

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अभियांत्रिकी क्षेत्रातील एम.टेक (Master of Technology) अभ्यासक्रम देशातील तरुण मोठ्या प्रमाणात नाकारत असल्याचे चित्र आहे. एका अहवालातून असे समोर आले आहे की, देशातील बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दर तीनपैकी दोन जागा रिक्त आहेत. (Two out of every three seats in engineering colleges are vacant)

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) अलिकडच्या अहवालानुसार, देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एम.टेकच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. २०१७-१८ नंतर एकूण पदव्युत्तर जागांमध्ये एक तृतीयांश घट झाल्यानंतरही ही परिस्थिती कायम आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या दोन शैक्षणिक वर्षांत एमटेकमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५ हजारापर्यंत कमी झाली आहे. 

अहवालानुसार, देशभरात एमटेकच्या ६४% जागा रिक्त आहेत. सात वर्षांपूर्वी, पदव्युत्तर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या १ लाख 85 हजार जागांपैकी फक्त ६८,६७७ जागा भरल्या गेल्या होत्या, त्यामुळे ६३% जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यानंतर २०२३-२४ मध्ये, एमटेकच्या 61 हजार जागा कमी करण्यात आल्या होत्या. आता 1 लाख 24 हजार जागांपैकी  रिक्त जागांचे प्रमाण ६४ टक्के आहे. म्हणजेच  केवळ ४५ हजार ४७ विद्यार्थी या अभ्यासक्रमात पदवी घेत आहेत. गेल्या दोन शैक्षणिक वर्षांत एम.टेकमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे. २०२२-२३ मध्ये फक्त ४४ हजार ३०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यामुळे ६६% जागा रिक्त राहिल्या होत्या. 

मीडिया रिपोर्टनुसार, याविषयी बोलताना एआयसीटीईचे सदस्य सचिव राजीव कुमार म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणात फारसा  रस दाखवलेला नाही, जो चिंतेचा विषय आहे. बी.टेक पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पगारात आणि एम.टेक केल्यानंतर मिळणाऱ्या पगारात फारसा फरक नाही, यामुळे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणाकडे वळत नाहीत. शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यास इच्छुक असलेले विद्यार्थीच एमटेक अभ्यासक्रम घेण्याचा विचार करतात. इतर क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी एमटेकची निवड करत नाहीत. तर बहुतेक विद्यार्थी कामाच्या क्षेत्रात आपले करिअर सुरू करू इच्छितात आणि म्हणूनच त्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे नसते.