पुणे जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या 350 जागाच का भरणार ? 

रिक्त जागांची भरती आता जिल्हा परिषद नाही तर पुणे महापालिका प्रशासनाकडून केली जाणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या 350 जागाच का भरणार ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक भरतीची प्रक्रिया (Teacher Recruitment Process) पुढील आठवड्याभरात सुरू होणार असून कोकणात सुमारे सहा हजारांहून अधिक जागांसाठी भरती केली जाणार आहे.अद्याप कोणत्या जिल्हात किती जागा भरल्या जातील याबाबतची माहिती समोर आली नसली तरी शिक्षण विभागातील (Department of Education ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा परिषदेत (Pune Zilla Parishad) शिक्षकांच्या सुमारे 350 जागा रिक्त आहेत. त्यामूळे केवळ याच जागांवर भरती राबवली जाणार आहे. परिणामी फार कमी उमेदवारांना पुण्यात शिक्षक होण्याची संधी  मिळणार आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हिवाळी अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.सध्या अंतरजिल्हा बादलीची प्रक्रिया राबवली जात आहे.त्यामुळे भरती  प्रक्रिया काही दिवस पुढे गेली आहे.तसेच राज्यात शिक्षकांची एकूण किती पदे भरली जाणार आहेत? , कोणत्या जिल्ह्यात किती पदे आहेत ? ,अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना हवी आहेत.तसेच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात किती जागा भरल्या जाणार या बद्दलही अनेकांना उत्सुकता आहे.

हेही वाचा : नववी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचा होणार समावेश

गेल्या काही वर्षात पुणे महानगरपालिकेत परिसरातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे समाविष्ठ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आपोआप पालिकेत झाला आहे.परिणामी या शाळेतील रिक्त जागांची भरती आता जिल्हा परिषद नाही तर पुणे महापालिका प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यामुळे सध्या पुणे जिल्हा परिषदेकडे सुमारे 350 जागा रिक्त आहेत.त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यात फार कमी जागांवर शिक्षक भरती होणार आहे.
--------------------------------

पुणे जिल्हा परिषदेकडून कमी पदांवर भरती केली जाणार असली तरी शाळा पालिकेकडे वर्ग झाल्यामुळे पालिकेकडे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या अधिक दिसणार आहे.त्यामुळे पुण्यात जिल्हा परिषदेकडून कमी जागावर भरती होणार असली तरी पालिकेकडून अधिक जागांवर भरती केल्याचे दिसून येईल,असे शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.