कोचिंग सेंटरची दूकानदारी बंद, केंद्राची नियमावली प्रसिध्द ,क्लास चालकांवर अनेक निर्बंध 

 विद्यार्थ्यांना दिशाभूल करणारी आश्वासने देता येणार नाही.तसेच कोचिंग सेंटर रँक किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाही.

कोचिंग सेंटरची दूकानदारी बंद, केंद्राची नियमावली प्रसिध्द ,क्लास चालकांवर अनेक निर्बंध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना,आगीच्या घटना आणि कोचिंग सेंटरमधील (coaching center) सुविधांचा अभाव या पार्श्ववभूमीवर शिक्षण मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला असून कोचिंग सेंटरसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर (New guidelines announced) केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनानुसार,कोचिंग सेंटरमध्ये  १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही.  विद्यार्थ्यांना दिशाभूल करणारी आश्वासने देता येणार नाही.तसेच कोचिंग सेंटर रँक किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाही,असे केंद्राच्या नव्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

कोटा येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कोचिंग क्लासमध्ये आगीच्या घटनाही घडल्या होत्या.त्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेली नियमावली उपयुक्त ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या कोचिंग क्लास चालकांना यामुळे चाप बसणार आहे.

हेही वाचा : नांदेडच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थी प्रवेशाची स्थिती चिंताजनक; असरचा धक्कादायक अहवाल

केंद्राच्या या नियमावलीनुसार कोणतेही कोचिंग सेंटर पदवी पेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करणार नाही. पालकांना दिशाभूल करणारी आश्वासने देता येणार नाही.कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवण्यासाठी दर्जेदार किंवा चांगल्या गुणांची हमी देता येणार नाही.विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवी, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोचिंग सेंटर्स कोणत्याही शिक्षकाची किंवा नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीची सेवा घेऊ शकत नाही.या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असलेली समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय कोणत्याही संस्थेची नोंदणी केली जाणार नाही.नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार,कोचिंग सेंटर्सकडे शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील असलेली वेबसाइट असणे बंधनकारक असेल. 

कोचिंग क्लासकडून विविध अभ्यासक्रमासाठी आकारले जाणारे शिक्षण शुल्क हे वाजवी असावे. तसेच विद्यार्थ्यांना आकारलेल्या शुल्काच्या पावत्या उपलब्ध करून द्याव्यात. जर विद्यार्थ्याने कोर्ससाठी पूर्ण पैसे भरले असतील आणि नियोजित कालावधीच्या मधोमध तो कोर्स सोडत असेल, तर विद्यार्थ्याला उरलेल्या कालावधीसाठी आधीच जमा केलेली फी १० दिवसांच्या आत परत केली जावी, आदी सूचना या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आल्या आहेत.

---------

या लिंकवर  नियमावली उललब्ध आहे. 

https://www.education.gov.in/sites/upload_files/mhrd/files/Guideliens_Coaching_Centres_en_0.pdf