सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आयुष मंत्रालयाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतीय ज्ञानशाखांच्या संशोधन व प्रशिक्षणात अग्रेसर आहे. विद्यापीठातील हा प्रकल्प म्हणजे या क्षेत्रातील विद्यापीठाने केलेल्या कार्याचा गौरवच आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आयुष मंत्रालयाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) आरोग्यशास्त्र विभागास ‘आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स’ या प्रकल्पाकरीता नुकतेच अर्थसहाय्य मंजूर केले आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (National Centre for Cell Science) व भारती विद्यापीठाचे औषधशास्त्र महाविद्यालय (Poona College of Pharmacy) यांच्या सहकार्याने सुरु होत आहे. 

 विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी याबाबत म्हणाले “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतीय ज्ञानशाखांच्या संशोधन व प्रशिक्षणात अग्रेसर आहे. विद्यापीठातील हा प्रकल्प म्हणजे या क्षेत्रातील विद्यापीठाने केलेल्या कार्याचा गौरवच आहे. जग अनेक समस्यांनी ग्रस्त असताना आयुर्वेद व योग यांच्या ज्ञानाचा वारसा अभ्यासणे आवश्यक आहे. विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागाबरोबरच जैव माहितीशास्त्र, प्राणिशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र हे विभागही या प्रकल्पात सहभागी आहेत. याद्वारे आयुर्वेदाच्या आंतरशाखीय संशोधनास चालना मिळेल.” 

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. मोहन वाणी यांनी या प्रकल्पातील संस्थेच्या सहभागाची माहिती दिली. ते म्हणाले “आधुनिक साधनांच्या सहाय्याने आयुर्वेदाच्या संकल्पना व औषधांचा अभ्यास या प्रकल्पात अभ्यासाला जाईल. आयुर्वेदाच्या औषधांचा सांध्यांच्या विकारामध्ये होणारा उपयोग तसेच आयुर्वेद चिकित्सेने शरीरातील जीवाणुंवर होणारा परीणाम या प्रकल्पात अभ्यासला जाणार आहे.” 

भारती विद्यापीठाचे औषधशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आत्माराम पवार यांनीही या प्रकल्पातील औषधशास्त्र महाविद्यालयाच्या सहभागाबाबत माहिती दिली. “हा प्रकल्प खऱ्या अर्थाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या एकत्रित संशोधन  संकल्पनेचे उत्तम उदाहरण आहे. बायोटेक्नॉलॉजी, फार्मसी,  मॉलिक्युलर बायोलॉजी, हेल्थकेअर अशा क्षेत्रातील सर्व तज्ञ एकत्र येत असल्यामुळे उत्तम संशोधन यातून होणार आहे.” असे त्यांनी नमूद केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभाग सुमारे २५ वर्षे आयुर्वेद व योग संशोधनात अग्रेसर आहे. विभागातील डॉ.भूषण पटवर्धन यांनी संशोधनाची सुरुवात केली. या विभागाने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे प्रकल्प सिद्धीस नेले आहेत. डॉ.पटवर्धन हे आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक तसेच या प्रकल्पाचे मार्गदर्शक देखील आहेत. या प्रकल्पाबद्दल बोलताना डॉ. पटवर्धन म्हणाले “आयुर्वेदाची ज्ञानपरंपरा व अत्याधुनिक विज्ञान यांच्या परस्पर संवादाची आज आवश्यकता आहे. हा संवाद संशोधन रूपाने विकसित व्हावा याकरीता हा प्रकल्प मोलाची भूमिका पार पाडू शकतो. ‘आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स’ हा सन्मान विद्यापीठास दुसऱ्यांदा मिळाला असून विद्यापीठाच्या कार्याचा हा गौरव आहे.” 

या प्रकल्पातील संशोधक विविध क्षेत्रातील मान्यताप्राप्त अभ्यासक आहेत. त्यामध्ये डॉ. मोहन वाणी यांच्यासह डॉ धीरज धोत्रे, डॉ उर्मिला अस्वार, डॉ मनाली जोशी, डॉ स्मिता सक्सेना, डॉ अतुल भारदे, डॉ रिचा अश्मा, डॉ कल्पना पै, डॉ प्रीती चव्हाण-गौतम व डॉ गिरीश टिल्लू यांचा समावेश आहे. दरम्यान, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पराग काळकर व कुलसचिव प्रा. विजय खरे यांनी या संशोधकांचे अभिनंदन केले आहे.