संध्या गायकवाड यांची बदली; संजय नाईकडे झेडपीचे नवे प्राथमिक शिक्षण अधिकारी 

संध्या गायकवाड यांची बदली राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेत झाली आहे.

संध्या गायकवाड यांची बदली; संजय नाईकडे झेडपीचे नवे प्राथमिक शिक्षण अधिकारी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी (Primary Education Officer of Pune Zilla Parishad)पदाची जबाबदारी संजय नाईकडे (Sanjay Naikade)यांच्याकडे देण्यात आली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला.या पदावर कार्यरत असलेल्या शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड (Sandhya Gaikwad)यांची बदली राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेत झाली आहे.त्यामुळे यापुढील काळात जिल्हयातील प्राथमिक शिक्षणाशी निगडीत अनेक आव्हानांना नाईकडे यांना सामोरे जावे लागणार आहे.दरम्यान,विद्यार्थी, शिक्षक गुणवत्ता वाढीबरोबरच पालकांच्या मनात जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत एक आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी पुढील काळात काम करणार असल्याचे नाईकडे यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कामकाजावर राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यावर जिल्हा परिषदेने या घटनेची गंभीर दाखल घेऊन अंतर्गत चौकशी करून दोन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली होती.तसेच शिक्षण विभागातील रखडलेली कामे वेळेत मार्गी का लागली नाहीत, यावर संध्या गायकवाड यांना लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले होते.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लवकरच बदल होतील, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात होती.अखेर प्राथमिक शिक्षण अधिकारी पदाची जबादारी संजय नाईकडे यांच्याकडे सोपवण्यात आली. संजय नाईकडे हे यापूर्वी  पिंपरी चिंचवड महापालिकेत कार्यरत होते.त्यांना शिक्षण विभागातील कामाचा दीर्घ अनुभव आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी पदाची स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे. 

नाईकडे म्हणाले, विद्यार्थी केंद्रबिंदू माणून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याला प्राधान्य दिले जाईल.शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता व पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्यावर भर दिला जाईल.  जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन श्रेणी, पदोन्नतीचे अनेक प्रश्न असून काही प्रश्न तालुका स्तरावर सुटण्यासारखे आहेत.हे प्रश्न शिबरांच्या माध्यमातून सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच पालक आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांच्यातील वाद किंवा तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 15 दिवस अथवा महिन्यातून एकदा संवाद दिनाचे आयोजन करण्याचा मानस आहे. 
-----------------