वाचन संस्कृतीला बळकट करणारी चळवळ यशस्वी करण्याचे राजेश पांडे यांचे आवाहन
शांतता, पुणेकर वाचत आहेत’ या अनोख्या उपक्रमाचे येत्या ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्याच्या वाचन आणि शैक्षणिक संस्कृतीला बळकट करण्यासोबतच जगात पुण्याची नवी ओळख करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने १४ ते २२ डिसेंबर २०२४ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होत आहे. या महोत्सवात पुणेकरांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्यासाठी ' शांतता, पुणेकर वाचत आहेत’ या अनोख्या उपक्रमाचे येत्या ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शहरातील प्रत्येकाने या ठरलेल्या वेळेत, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेले पुस्तक वाचायचे असून, वाचनासाठी प्रेरणा इतरांनाही द्यायची आहे, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आणि न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे यांनी केले. डॉ.आनंद काटिकर, डॉ. संजय चाकणे आदी यावेळी उपस्थिती होते.
पांडे म्हणाले, या उपक्रमामुळे पूर्ण पुणे स्तब्ध झाले असेल,संपूर्ण पुणे वाचत असेल एक तास थांबा, वाचन करा असे आवाहन आहे.पुणे महापालिका, पुणे विद्यापीठ, सर्व खासगी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, उद्योग, राजकीय पक्ष, संघटना, गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था, ग्रंथालये, उद्याने, मोठे चौक अशा सर्व सार्वत्रिक ठिकाणी हे उपक्रम होतील..
पुस्तक वाचन करणाऱ्याचे नाव, कुठले पुस्तक वाचले, कुठे वाचले ही माहिती पुस्तक वाचणाऱ्याच्या फोटोंसह द्यायची आहे. ही संख्या या वेळी लाखाच्या पुढे जाणार असल्याचा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला.
एनबीटीच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सव यंदा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत उत्साहात होत आहे. या महोत्सवात पुणेकरांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पुणे शहराला वाचन संस्कृती जपणारे शहर, अशी नवी ओळख देण्यासाठी, पुणेकरांनी आपला महोत्सव समजून विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. यात एक पाऊल पुढे जात येत्या ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत 'शांतता, पुणेकर वाचत आहे' या नाविन्यपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहराच्या वाचन परंपरेला पुढे नेण्यासाठी एकत्र यावे लागणार आहे.
या उपक्रमात आपण दिलेल्या वेळेत ज्या ठिकाणी असाल, त्या ठिकाणी उपलब्ध असलेले किंवा आपल्या आवडीचे पुस्तक वाचायचे आहे. त्यानंतर याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ आपण फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, लिंकडीन अशा समाजमाध्यमावर #पुणेपुस्तकमहोत्सव या हॅशटॅगसह पोस्ट करण्यासोबतच आम्हाला या लिंकवर पाठवायची आहे. गेल्यावर्षी म्हणजे २०२३ साली या उपक्रमात ७,५०० पेक्षा अधिक संस्था सहभागी झाल्या होत्या. न्यायाधीश, वकील, पत्रकार, पोलीस अधिकारी, कैदी, आणि अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांनी देखील वाचन करतानाचे छायाचित्र पाठवले होते. यंदा या उपक्रमात या सर्वाचा सहभाग तीन पट होईल, अशी आम्हाला खात्री आहे. ‘पुणेकर वाचनासाठी एकत्र येत आहेत’ ही भावना या महोत्सवाचा गाभा आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अभ्यासकांनी आपला सहभाग नोंदवून वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन एनबीटीचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
.................
या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, वाचन करतानाचे आपले छायाचित्र आम्हाला https://pbf24.in/register लिंकवर पाठवावे.- फेसबुक, एक्स, लींकडीन, इंस्टाग्राम अशा समाजमाध्यमावर #पुणेपुस्तकमहोत्सव या हॅशटॅगसह शेअर करावा. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यालये, कंपन्या आणि विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवावा. पुणे शहरातील वाचनालयात या उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडून सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
....