राज्यातील या शाळांमधील शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश ; १२ हजार ९४७ शाळांना फटका बसण्याची शक्यता

शाळांकडून माहिती अद्यावत होत नसल्यामुळे संबंधित शाळांमधील शिक्षकांचे वेतन अदा करू नये. जिल्हा व तालुका स्तरावरील वेतन पथकांनी शाळांकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक  यांची सर्व माहिती अद्यावत केल्याचे मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घ्यावे.

राज्यातील या शाळांमधील शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश ; १२ हजार ९४७ शाळांना फटका बसण्याची शक्यता

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

यु-डायस प्लस (U-Dias Plus)ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती अध्यायावत न करणाऱ्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन थांबवण्यात यावे, असे आदेश समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे (Samagra Shiksha Maharashtra Primary Education Council) राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे (State Project Director Pradeep Kumar Dange) ) यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत यु-डायस प्लस प्रणाली मधील माहिती अध्यायावत करावी लागणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील भौतिक सुविधा, शिक्षक संख्या, विद्यार्थी संख्या आदी माहितीच्या आधारे राज्य व केंद्र शासनाकडून २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षासाठी वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. त्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांनी आवश्यक माहिती अध्यायावत करावे, असे आदेश देण्यात आले होते. परंतु, बहुतांश शाळांनी याकडे दुर्लक्ष केले. माहिती अध्यायावत न झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थी शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक सोयी सुविधा, शिष्यवृत्ती आदी गोष्टींपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत सर्व माहिती अध्यायावत करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : 'PARAKH' च्या पहिल्या राज्य शैक्षणिक सर्वेक्षणाकडे राज्यांनी फिरवली पाठ

यु-डायस प्लस प्रणाली मधील अहवालानुसार तब्बल ८८ टक्के शाळांनी भौतिक माहिती अद्यावत केलेले आहे. ७६ टक्के शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम करण्यात आली असून ७१ टक्के विद्यार्थ्यांची माहिती अंतिम झालेली आहे. मात्र, तब्बल २५ हजार ७८८ शाळांनी शिक्षकांची माहिती भरण्याकरता अद्याप सुरुवातच केलेली नाही.तर १२ हजार ९४७ शाळा भौतिक माहिती भरण्यास चालढकल करत आहेत. त्यामुळे समग्र शिक्षा, स्टार्स व पीएम श्री योजनेचे वार्षिक नियोजन करण्यास विलंब होत आहे.

शाळांकडून माहिती अद्यावत होत नसल्यामुळे संबंधित शाळांमधील शिक्षकांचे वेतन अदा करू नये. जिल्हा व तालुका स्तरावरील वेतन पथकांनी शाळांकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक  यांची सर्व माहिती अद्यावत केल्याचे मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घ्यावे. त्यानंतरच वेतन अदा करावे, असे प्रदीपकुमार डांगे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
--------------------