धो..धो... पावसात प्राध्यापकाचे सेवानिवृत्ती वेतनासाठी शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन
सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस बाकी असून धोधो पावसात त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.तसेच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुध्दा संचालक कार्यालयासमोर करायचा, असा इशारा ठोंबे यांनी दिला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पूर्णवेळ वेतननिश्चिती करावी, पूर्णवेळ वेतन मिळावे, तसेच सेवानिवृत्ती वेतन मिळावे, या मागणीसाठी व न्याय हक्कासाठी १५ मे २०२५ पासून प्राध्यापक दिलीप ठोंबे हे पुण्यातील राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर कुटुंबासह धरणे आंदोलन व उपोषण करत आहेत. त्याच्या सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस बाकी असून धोधो पावसात त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.तसेच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुध्दा संचालक कार्यालयासमोर करायचा, असा इशारा ठोंबे यांनी दिला आहे.
प्राध्यापक ठोंबे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील बोधेगाव तालुक्यातील शेवगाव येथील आबासाहेब काकडे कला महाविद्यालय प्राध्यापक पदावर सन- १९९९ पासून कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार नियुक्ती पासून त्यांचा पूर्णवेळ कार्यभार आहे. पूर्णवेळ कायमस्वरूपी विद्यापीठ मान्यता असून पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक, कार्यालयाने त्यांना सन -२००६ व २०११ मध्ये अनुदान निर्धारण अहवालात पूर्णवेळ मान्यता दिलेली आहे. तसेच उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने आदेश दिलेला आहे . तसेच २९ जानेवारी २०२५ रोजी मुंबई येथे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत पाटील यांनी या केस मध्ये हायकोर्टाचा आदेश आहे तर सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे ही केस समजून घेऊन लक्ष घालून ८ दिवसात यावर सकारात्मक कार्यवाही करावी, असे आदेश उच्च शिक्षण विभागाला दिले होते. मात्र,उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी अजूनही हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे.
विभागीय सहसंचालक कार्यालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व त्यांच्याच महाविद्यालयातील प्रा. बाळासाहेब बनसोडे यांच्याप्रमाणे समान न्याय तत्त्वानुसार सदसदविवेक बुद्धीने तात्काळ निर्णय घ्यावा,अशी अपेक्षित ठोंबे यांनी व्यक्त केली आहे.
दिलीप ठोंबे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आंदोलन स्थळी शुक्रवार दि.३० मे २०२५ रोजी दुपारी १२ :०० वा. आयोजित करण्यात आलेला असून यावेळी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. लवांडे, सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. मगन ताटे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. फसले उपस्थित असणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आबासाहेब काकडे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले आहे.