वारे गुरुजींची जालिंदर नगरची शाळा जगात भारी; मिळाला ' बेस्ट ऑफ द बेस्ट' स्कूलचा बहुमान
एक शिक्षक जिद्दीला पेटल्यानंतर काय घडू शकते. याचे मूर्तीमंत उदाहरण वारे गुरुजी यांनी दाखवून दिले आहे. या शाळेला बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल म्हणून गौरविण्यात आले आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या केवळ महाराष्ट्रात, देशात नाही तर जगात पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून येण्याचा बहुमान पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने (zp jalindarnagar school)मिळवला आहे. वाबळेवाडीची शाळा जगाच्या नकाशावर घेऊन जाणाऱ्या दत्तात्रय वारे गुरुजी (dattatray ware)यांनी हे शक्य करून दाखवले आहे. त्यामुळे एक शिक्षक जिद्दीला पेटल्यानंतर काय घडू शकते. याचे मूर्तीमंत उदाहरण वारे गुरुजी यांनी दाखवून दिले आहे. या शाळेला बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल म्हणून गौरविण्यात आले आहे.
जागतिक पातळीवरील T 4 Education या संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या “वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज“या (World Best School Prize) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत पहिल्या 10 शाळांमध्ये ( top 10 schools) येण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या मतदानानंतर जालिंदर नगर येथील शाळेला जगातील पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून जाहीर करण्यात आली आहे. टॉप स्कूल म्हणून शाळेची घोषणा करण्यात आली आहे.
एका उजाड माळरानावर वारे गुरूजींनी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी केली आहे. जालिंदरनगर येथील शाळेने जागतिक पातळीवरील T 4 Education या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या “वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज“ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये जाणीवपूर्वक सहभाग घेतला. ' लोकसहभागातून शाळा विकास' या स्पर्धेच्या विभागांमध्ये शाळा सहभागी झाली. त्यात बक्षीस मिळवणे हा शाळेचा हेतू नव्हता, तर जागतिक दर्जाच्या शाळा व जागतिक दर्जाचे शिक्षण सरकारी शाळेत उपलब्ध करून देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून केलेल्या प्रयत्नाचा एक भाग होता. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अथवा खाजगी शाळांच्या पार्श्वभूमीवर आपण नेमके कोठे आहोत? हे यानिमित्ताने पाहता येईल, हा मुख्य उद्देश होता.
मंगळवारी 'लोकसहभागातून शाळा विकास' या गटात शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.