हुर्रर्रे... सकाळची शाळा आता नऊ नंतरच भरणार; शाळांच्या वेळा बदलल्या

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळा बदलण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे. 

हुर्रर्रे... सकाळची शाळा आता नऊ नंतरच भरणार; शाळांच्या वेळा बदलल्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे वर्ग सकाळी नऊ वाजल्यानंतर भरवले जातील, याबाबतची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी केली होती. त्यावर गुरूवारी शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) शाळांच्या वेळा (School time)बादलण्याबाबत सविस्तर अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. मात्र, या अध्यादेशाची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून करावयाची आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळांना अत्यंत अपरिहार्य कारणामुळे ही अंमलबजावणी करण्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून त्याबाबत यथोचित निर्णय घ्यावा,अशी मुभा देखील देण्यात आली आहे,असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे(Education Commissioner Suraj Mandre)यांनी सांगितले. 

काही दिवसांपुर्वी राजभवनातील एका कार्यक्रमात भाषणावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला  सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना केली होती. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर आज रोजी सकाळच्या सत्रातील शाळांचे वेळ पदलण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे. 

शासनाने प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी ९ किंवा ९ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी ९ वा. च्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ नंतर ठेवावी.

शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी. 

----------------------------------------

हा निर्णय घेताना विचारात घेलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे 

१. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी ७ नंतर असल्याचे दिसून येते.
२. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.
३. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात.
. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो.
५. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात.
६. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते.
७. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅन द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात. ८. यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
९. यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुस-या सत्राचा विचार करावा.

-----------------------------