सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही…! सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका, हेरंब कुलकर्णींची घेतली भेट

हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी (दि. ७) शाळेतून घरी परतत असताना तिघा तरुणांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून चार टाके पडले आहेत.

सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही…! सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका, हेरंब कुलकर्णींची घेतली भेट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लेखक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्या दोन दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी सोमवारी (दि. ९) कुलकर्णी यांच्या अहमदनगर येथील घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. तसेच सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही आतापर्यंत त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. या गुंडाना कोण अभय देतेय याचीही कसून चौकशी करण्याची मागणी केली.

 

हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी (दि. ७) शाळेतून घरी परतत असताना तिघा तरुणांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून चार टाके पडले आहेत. त्यानंतर कुलकर्णी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तीन अनोखळी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेला ४८ तास उलटूनही पोलिसांनी तपास सुरू केला नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी केला आहे.

लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला

 

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांची सोमवारी घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधून घडलेला प्रसंग जाणून घेतला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, रोहिणी खडसे याही त्यांच्यासोबत होत्या.  

 

तत्पुर्वी, सुळे यांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवरून सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटले  आहे की, भाजपच्या शासनकाळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित आहे. महाराष्ट्र गुंडांसाठी जणू नंदनवन झाले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हि घटना अतिशय संतापजनक आहे.

 

समतेच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली.‌ हे अतिशय चिंताजनक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. त्यांचे गृहखात्याकडील अक्षम्य दुर्लक्ष सामान्यांच्या जीवावर बेतत आहे. सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही आतापर्यंत त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. या गुंडाना कोण अभय देतेय याचीही कसून चौकशी होण्याची गरज आहे. या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने गजाआड करा, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k