व्यक्ती, समाज आणि निसर्ग याला अनुलक्षून नवे शैक्षणिक धोरण : डॉ. नितीन करमळकर

नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनानिमित्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर चर्चासत्र

व्यक्ती, समाज आणि निसर्ग याला अनुलक्षून नवे शैक्षणिक धोरण : डॉ. नितीन करमळकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शालेय विद्यार्थ्यांपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे,  या मुद्द्यांचा अंतर्भाव नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP)करण्यात आलेला आहे. व्यक्ती, समाज आणि निसर्ग याला अनुलक्षून नवे शैक्षणिक धोरण आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु (Former Vice Chancellor of Savitribai Phule Pune University)व एनईपी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर (Dr. Nitin Karmalkar)यांनी दिली.

अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्स, संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, भावार्थ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनात  ‌‘करियर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. करमळकर बोलत होते. या परिसंवादात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रीसर्च पार्क फाऊंडेशनचे सीइओ डॉ. अरविंद शाळीग्राम, शिरूरच्या सी. टी. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे अध्यक्ष डॉ. संजय गांधी, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील भिरुड, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे डॉ. मिलिंद वाकोडे यांचा सहभाग होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी होत्या.
कृत्रिम बुद्धिमत्ता याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होत असली तरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका नाही, असे नमूद करून डॉ. नितीन करमळकर म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुण विकसित करण्यास वाव मिळणार आहे. शिक्षण घेताना त्याला ज्या गोष्टी रुचतील, आवडतील त्या गोष्टींचे शिक्षण घेऊन विद्यार्थ्याने पारंगत व्हावे, अशी संकल्पना या नव्या शैक्षणिक धोरणात आहे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खासदार  डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आपल्याला आपल्यातील भारतीयत्व टिकवून, आपल्यामधील अस्मिता जागृत करून, नव्या-जुन्या ज्ञानाचे एकत्रिकरण करून स्वत:ला पुढे न्यायचे आहे. या दृष्टीने मार्गदर्शन करणारे नवे शैक्षणिक धोरण आहे. दहावी-बारावी नंतर किवा पदवी नंतर व्यावसायिक शिक्षण असा पूर्वी विचार व्हायचा. पण आता शाळास्तरापासूनच याचा विचार करण्यात आला आहे.