शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास...; शिक्षण विभागाने स्पष्टच सांगितले

काही अपरिहार्य कारणास्तव ही भरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास..

शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास...; शिक्षण विभागाने स्पष्टच सांगितले

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education)पवित्र पोर्टलमार्फत (Pavitra portal)होत असलेली शिक्षक भरती (Teacher Recruitment)पारदर्शी पद्धतीने राबवली जात असून  भविष्यात होऊ घातलेल्या सन २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पदभरती करण्याचा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे.पण काही अपरिहार्य कारणास्तव ही भरती लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections)पूर्ण न झाल्यास प्रचलित कार्यपद्धतीनुसार ती पुढे पूर्ण करण्यात येईल.त्यामुळे पात्र अभियोग्यताधारकांनी याबाबत अनावश्यक चिंता करू नये, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या न्यूज बुलेटीनद्वारे करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिरातींवरील कार्यवाही भविष्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे  पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे किंवा स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे अथवा विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे या सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही,अशा अभियोग्यताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण व दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे. याबाबत न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांमध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार असल्यामुळे ती सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.पात्र अभियोग्यताधारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतीलतर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाईल.

काही अभियोग्यताधारक शिक्षक पदभरतीबाबत समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत, पात्र अभियोग्यताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे.समाजमाध्यमावर (उदा., टेलीग्राम, व्हॉटसअॅप, युटयुब, इन्स्टाग्राम इत्यादी) चुकीची माहिती, स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करुन पात्र अभियोग्यताधारकांमध्ये प्रक्षोभक/संभ्रम निर्माण/चिथावणी देणारे / उमेदवारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण करणाऱ्या व त्यांचे समर्थन करणाऱ्याविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत,असेही शिक्षण विभागाने न्यूज बुलेटीनद्वारे स्पष्ट केले आहे.