मुलींच्या मोफत शिक्षण योजनेचा मंत्र्यासमोरच भांडाफोड, गरवारे महाविद्यालयाला अचानक भेट 

स्टुडंट हेल्पिंग हँडसच्या शिष्टमंडळाने मंत्री चंद्रकात पाटील यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रमुख मुद्दा म्हणून मुलींच्या मोफत शैक्षणिक शुल्कमाफीचा प्रश्न मांडण्यात आला आणि मंत्र्यासमोरच योजनेचा भांडाफोड झाला. 

मुलींच्या मोफत शिक्षण योजनेचा मंत्र्यासमोरच भांडाफोड, गरवारे महाविद्यालयाला अचानक भेट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दस्तुरखुद्द उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जेव्हा विद्यार्थिनीला  मुलींच्या मोफत शिक्षण या योजनेबाबत विचारणा करतात आणि सदर विद्यार्थिनी ही योजना फक्त कागदावरच असल्याचे सांगते तेव्हा काय घडते. यांची प्रचिती लवकरच येणार आहे? कारण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे महाविद्यालयांना भेट देवून वास्तूस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

पुण्यात स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या आरोग्य सर्वेक्षणाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil) यांनी प्रसारमाध्यमांद्वारे माहिती घेतली होती. यावेळी एका खाजगी वाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले होते की, संबंधित विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या विविध समस्या समजून घेऊन योग्य तो उपाय करेन. यावेळी स्टुडंट हेल्पिंग हँडसच्या (Student Helping Hands) शिष्टमंडळाने मंत्री चंद्रकात पाटील यांची भेट घेतली.  यावेळी  शिष्टमंडळातील साक्षी शिरसागर या विद्यार्थिनीला चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या मोफत शिक्षण या योजनेबाबत विचारणा केली.यावर  विद्यार्थिनीने स्पष्ट केले की तिची फी अद्याप माफ झालेली नाही. त्यानंतर, मंत्री महोदयांनी त्वरित या प्रकरणाची माहिती घेतली आणि उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर यांना फोन करून आबासाहेब गरवारे महाविद्यालयात उद्या भेटीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, पारंपरिक अभ्यासक्रमांच्या शुल्काबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संचालकांना दिले. याशिवाय, दर आठवड्याला पुण्यातील महाविद्यालयांना भेट देण्याचा निर्णय त्यांना घेतला. मात्र पाटील यांच्या या तत्काळ घेतलेल्या निर्णयामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ झाल्याचे बोलले जात आहे.  

यासोबतच, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेत प्रति जिल्हा 500 विद्यार्थ्यांची मर्यादा हटवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली. त्यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ हा नियम रद्द करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे, 500 मुलींना दोन वेळचे मोफत जेवण 1 मार्च 2025 पासून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी महाविद्यालय स्तरावर करण्यात यावी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्थ कार्ड देण्यात यावे. 

परदेशात उच्च व तंत्र शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी, तसेच त्यांना IELTS, TOEFL सारख्या पूर्व परीक्षांसाठी मोफत कोचिंग देण्यात यावे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सर्व शिष्यवृत्ती व वसतिगृहांची माहिती मिळण्यासाठी एक अॅप तयार करण्यात यावे. विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यात यावीत. पुण्यात स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती वसतिगृह सुरू करावे. शिवभोजन थाळीप्रमाणे महाविद्यालय स्तरावर गरजू विद्यार्थ्यांसाठी अन्न शिष्यवृत्ती देण्यात यावी. मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ प्रवेशावेळीच द्यावा आणि या योजनेत समाविष्ट अभ्यासक्रमांची संख्या वाढवावी. उच्च शिक्षण घेणाऱ्या स्थलांतरित्त विद्यार्थ्यांचा डेटा संकलित करावा, यांसारख्या मागणीचे निवेदन यावेळी स्टुडंट हेल्पिंग हँडस् शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहेत. 

---------------------------

गरवारे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. दोन मुलींनी आवश्यक कागदपत्र महाविद्यालयांकडे जमा केले नाहीत.त्यांनी कागदपत्र जमा केल्यास त्यांना तात्काळ शुल्क परत दिले जाईल.वारंवार मंगणीकडूनही अद्याप या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.तसेच शिक्षण विभागातर्फे महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या एनईपी अंमलबाजावणीची पाहणी केली जात आहे.त्यानिमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील हे महाविद्यालयाला भेट देणार आहेत,अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे.

- डॉ.विलास उगले, प्राचार्य, गरवारे कॉलेज, पुणे