एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या कला संचालनालयातर्फे (Directorate of Art) घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या (Elementary and Intermediate Drawing Grade Examination) निकालाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. इंटरमिजिएट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना येत्या 31 जानेवारी रोजी तर एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेचा निकाल  5 फेब्रुवारी रोजी निकाल (Elementary Drawing Exam Result February 5) ऑनालाईन प्रसिध्द केला जाणार आहे, कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक ना. म.  वाघमोडे (Controller of Examination N. m. Waghmode) यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

कला संचालनालयातर्फे 4 ऑक्टोबर 2023 ते 7 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये शासकीय रेखा कला परीक्षांचे अर्थात एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परेएकषांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी www.doa.maharashtra.in / https://dge.doamh.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच प्रमाणपत्र व दुय्यम निकाल पत्रक डाऊनलोड करणे,  निकाल पडताळणी करणे,  ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नाव मध्ये त्रुटी असल्यास नावातील त्रुटी दुरुस्ती करणे,  याकरिता ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

हेही वाचा : श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; विद्यापीठाचे पेपर स्थगित

कला संचालनालयाच्या परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या शाळांना लॉगिन वरून तीन वेळा प्रमाणपत्र डाऊनलोड करता येणार आहे. निकाल पडताळणीसाठी केंद्रप्रमुखांच्या लॉगिन वरून 22 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येकी 60 रुपये शुल्क भरून पडताळणीसाठी अर्ज करता येईल. ऑनलाइन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास त्रुटीच्या दुरुस्तीकरिता केंद्रप्रमुखांच्या लॉगिन वरून 22 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून त्यासाठी प्रति विद्यार्थी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.  तर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे शुल्क आकारले जाईल.

सर्व केंद्रप्रमुखांनी डाउनलोड करून ठेवलेले प्रमाणपत्रे जतन करून ठेवावीत. तसेच संबंधितांनी मागणी केल्यानंतर त्यांना ती उपलब्ध करून द्यावीत.  डाउनलोड केलेली प्रमाणपत्रे व दुय्यम निकालाचे जतन करून ठेवण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांची राहील.  केंद्रप्रमुखांनी प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी जतन करून ठेवावी व सहभागी शाळा तसेच विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यासंदर्भात उचित कार्यवाही करावी, असेही परीक्षा नियंत्रक वाघमोडे यांनी स्पष्ट केले आहे.