ओपन बुक परीक्षेवर CBSE कडून स्पष्टीकरण 

वैविध्यता असलेल्या भारतासारख्या मोठ्या देशात OBE मूल्यांकन सुरू करण्यापूर्वी बरीच तयारी आणि मार्गदर्शन आवश्यक आहे.

ओपन बुक परीक्षेवर  CBSE कडून स्पष्टीकरण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) राबवण्यात येणार असलेल्या ओपन बुक परीक्षा (Open Book Examination) प्रणालीबाबत सध्या शैक्षणिक वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे. पण आता या संदर्भात CBSE बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

सीबीएसई या प्रणालीची व्यवहार्यता तपासण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर  अभ्यास सुरू करण्याचा विचार करत आहे. ही एक मोठी प्रक्रिया आहे, असे बोर्डाने म्हटले आहे. या संदर्भात CBSE चे शैक्षणिक संचालक जोसेफ इमॅन्युएल यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले की, " ओपन बुक परीक्षा ही प्रणाली उच्च शिक्षणात वापरली जाते. यासोबतच अनेक शैक्षणिकदृष्ट्या प्रगत देशांनी ओबीई असेसमेंटही सुरू केले आहे. असे असले तरी वैविध्यता असलेल्या भारतासारख्या मोठ्या देशात OBE मूल्यांकन सुरू करण्यापूर्वी बरीच तयारी आणि मार्गदर्शन आवश्यक आहे."

दरम्यान विविध प्रसारमाध्यमांतूनही याबाबतची वेगळी माहिती समोर येत आहे. बोर्डाने सध्या काही शाळांना नववी ते बारावीच्या वर्गांसाठी ओबीई परीक्षा प्रायोगिक तत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती समोर आली होती. 

ओपन बुक परीक्षा प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पुस्तके किंवा नोट्स वापरण्याची परवानगी दिली जाईल. परीक्षेत विचारलेले प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी पुस्तके किंवा नोट्सची मदत घेऊ शकतात.