द्विलक्षी अभ्यासक्रम बंदला स्थगिती; 2025-26 पासून NSQF नुसार राबवणे बंधनकारक

NSQF  रूपांतरित व्दिलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रम हे शैक्षणिक वर्ष 2024- 25 ऐवजी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

द्विलक्षी अभ्यासक्रम बंदला स्थगिती; 2025-26 पासून NSQF नुसार राबवणे बंधनकारक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या सुरू असलेले द्विलक्षी अभ्यासक्रम बंद (Bifocal course closed)करून नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (National Skills Qualification Framework)अर्थात NSQF रूपांतरित नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2024-25  पासून सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करून मान्यता देण्यात आली होती. परंतु, सद्यस्थितीत चालू असलेले अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्था/ महाविद्यालयांना NSQF रूपांतरित नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational Courses) शैक्षणिक वर्षात 2024-25 मध्ये राबविण्यास स्थगिती देण्यात आली आहे.या बाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

युवकांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने रोजगार स्वयंरोजगार करण्यास प्रवृत्त करून महाविद्यालयीन शिक्षणाकडे जाणारा लोंढा थांबवा, या उद्देशाने राज्यात व्यावसायिक विषयांची 30% व्याप्ती असलेले द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. सध्या तांत्रिक, वाणिज्य, कृषी, मत्स्य या गटातील सुमारे 16 द्विलक्षी अभ्यासक्रम राबविले जातात. मात्र, 20 जून 2023 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून हे सर्व द्विलक्षी अभ्यासक्रम नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क शी सुसंगत करण्यात आले. मत्स्य गटातील फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी व फ्रेश वॉटर फिश कल्चर हे व्यवसाय अभ्यासक्रम तसेच तांत्रिक गटातील केमिकल प्लांट ऑपरेटर हे अभ्यासक्रम पीएसएससीआयव्हीई भोपाळ यांनी विकसित केलेले नसल्यामुळे बंद करण्यात आले आहेत.

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या शासन निर्णयानुसार NSQF  रूपांतरित व्दिलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रम हे शैक्षणिक वर्ष 2024- 25 ऐवजी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या संस्था महाविद्यालयांनी नवीन किंवा आधीच्या तुकड्यांना कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करायचे असतील त्यांना शासन निर्णयानुसार NSQF रूपांतरित नवीन व्यवसायिक अभ्यासक्रम 2025-26 पासून राबवणे बंधनकारक राहील.