सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुरूवारी एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांचे व्याख्यान 

एअर मार्शल व्ही. आर. चौधरी हे देशातील २७ वे हवाई दल प्रमुख आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुरूवारी एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांचे व्याख्यान 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे (Department of Defense and Strategic Sciences) येत्या गुरूवारी (दि . १४ डिसेंबर) रोजी जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात यावर्षी एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी (Air Chief Marshal V. R. Chowdhary) पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएसएम एडीसी हे 'भारतीय हवाई दलाचे समकालीन आणि भविष्यातील रेडी एरोस्पेस फोर्समध्ये परिवर्तन' या विषयावर व्याखान देणार आहेत.

ऑक्टोबर २०२१ पासून भारतीय हवाई दलाचे प्रमुख असलेले एअर मार्शल व्ही. आर. चौधरी हे देशातील २७ वे हवाई दल प्रमुख आहेत. त्यांना आतापर्यंत ३ हजार ८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असून ते मिग -२९ विमानांचे तज्ज्ञ आहेत. याआधी त्यांनी वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणूनही काम केलं आहे.

हेही वाचा : विद्यार्थी पीएच.डी.करून काय दिवे लावणार आहेत ? अजित पवारांचा सवाल

'गेटवे ऑफ नॉलेज' गेटची स्थापना करणाऱ्या जनरल बी. सी. जोशी यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा वारसा आणि दूरदृष्टींचा सन्मान करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाने १९९५ मध्ये जनरल बी. सी. जोशी यांच्या नावे वार्षिक व्याख्यानमाला सुरू केली होती. सन २००५ पासून जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमाला भारतीय लष्करी तिन्ही दलाच्या सेवा प्रमुखांपैकी एकाद्वारे वार्षिक आधारावर रोटेशनद्वारे स्मृती व्याख्यान आयोजित केले जाते.

या व्याख्यानमालेमध्ये राष्ट्रीय एकत्रीकरण, मूलभूत मूल्ये, भारतीय सांस्कृतिक सभ्यता, पर्यावरण संरक्षण, इको- डेव्हलपमेंट आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर आजपर्यंत विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. या व्याख्यानाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर हे पाहुणे म्हणून तर प्रभारी कुलसचिव आणि सामरिक शास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय खरे हे मुख्य निमंत्रक आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या या व्याखानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभाग प्रमुखांनी केले आहे.