वर्षात दोनदा प्रवेश, अडीच वर्षात पदवी; यूजीसीकडून नियमावली तयार..
पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांची डिग्री आता अडीच वर्षांत मिळविता येणार आहे. तर चार वर्षांची ऑनर्स डिग्री तीन वर्षांत प्राप्त करता येणार आहे. तर कॉलेजला वर्षातून दोनदा प्रवेश घेण्याची तरतूदही त्यात समाविष्ट करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) त्यासाठी नव्या नियमावलीचा मसुदा चर्चेसाठी प्रसिद्ध (Draft of new regulations published) केला आहे. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांची डिग्री आता अडीच वर्षांत मिळविता येणार आहे. तर चार वर्षांची ऑनर्स डिग्री तीन वर्षांत प्राप्त करता येणार आहे. तर कॉलेजला वर्षातून दोनदा प्रवेश (Admission twice a year) घेण्याची तरतूदही त्यात समाविष्ट करण्यात आली आहे.
युजीसीकडून प्रसिद्ध केलेल्या मसुद्यानुसार 'एक्सलरेटेड डिग्री प्रोग्राम' अंतर्गत तीन वर्षांची सहा सत्रांची डिग्री पाच सत्रांमध्ये, तर चार वर्षांची आठ सत्रांची डिग्री सहा किंवा सात सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येईल. त्यामुळे तीन वर्षांची डिग्री अडीच वर्षांमध्ये, तर चार वर्षांची डिग्री तीन किंवा साडेतीन वर्षांमध्ये मिळविण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुला झाला असेल. मात्र, विद्यार्थ्यांना त्या पदवीसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.
विद्यार्थ्यांना कमी करण्यात आलेल्या कालावधीतच डिग्रीसाठी आवश्यक क्रेडिटही प्राप्त करावे लागतील. तर 'एक्स्टेंडेड डिग्री प्रोग्राम' अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीचा कालावधी वाढविता येईल. त्यामुळे तीन किंवा चार वर्षांची पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त एक वर्षाचा किंवा दोन सत्रांचा कालावधी मिळू शकणार आहे. त्याशिवाय उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जुलै किंवा ऑगस्ट मध्ये, तसेच जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
शिक्षण संस्थांना या गोष्टी कराव्या लागणार
अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या १० टक्के विद्याथ्यांनाच एक्सलरेटेड डिग्रीचा पर्याय देता येईल. एक्स्टेंडेड डिग्रीसाठी विद्यार्थी संख्येची कोणतीही अट नसेल. संस्थांनी नियुक्ती केलेली समिती विद्यार्थ्यांच्या प्रथम आणि द्वितीय सत्रातील गुणवत्तेवरून त्यांची एक्सलरेटेड डिग्रीसाठी निवड करेल. त्यामध्ये विद्यार्थ्यांची कमी कालावधीत क्रेडिट मिळविण्याची क्षमता तपासली जाईल.
५० टक्के स्किल कोर्स, अप्रेंटिसशिपला
विद्यार्थ्यांना एखाद्या विद्याशाखेची डिग्री मिळविण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाला त्या विद्याशाखेतील ५० टक्के अभ्यासक्रम घ्यावे लागणार आहेत. यानुसार विद्यार्थ्यांना त्या विद्याशाखेचे ५० टक्के क्रेडिट मिळवावे लागतील, त्याच्या जोडीला विद्यार्थी उर्वरित ५० टक्के क्रेडीट हे स्कील कोर्सेस, अप्रेंटिसशिप आणि अन्य विद्याशाखांतील विषय घेऊन मिळवू शकतील.