UGC कडून एमफिलचा नियम शिथिल; या विद्यार्थ्यांना दिली सूट 

क्लिनिकल सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिक सोशल वर्कमध्ये एमफिल अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष 2025-26 पर्यंत प्रवेश घेऊ शकतात.

UGC कडून एमफिलचा नियम शिथिल; या विद्यार्थ्यांना दिली सूट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) काही दिवसांपूर्वी एम. फिलचे (MPhil-मास्टर ऑफ फिलोसॉफी) प्रवेश तातडीने थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता हा नियम शिथिल करत UGC  ने क्लिनिकल सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिक सोशल वर्कमध्ये (Clinical Psychology and Psychiatric Social Work)एमफिलची वैधता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात   UGC  ने अधिकृत परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार,आता इच्छुक विद्यार्थी  क्लिनिकल सायकॉलॉजी आणि सायकियाट्रिक सोशल वर्कमध्ये एमफिल अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष 2025-26 पर्यंत प्रवेश घेऊ शकतात.

पूर्वीच्या नियमांमध्ये अंशत: शिथिलता देऊन, "मानसिक आरोग्य सेवा प्रदान करण्यात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि मानसोपचार सामाजिक कार्यकर्त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन," या दोन अभ्यासक्रमामध्ये आता एम.फिल. साठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पाच नावे निश्चित; कोण होणार कुलगुरू

दरम्यान, युजीसीने नोव्हेंबर २०२२ मध्ये (पीएचडी पदवी देण्यासाठी किमान मानके आणि प्रवेश प्रक्रिया) अधिनियम २०२२ प्रसिद्ध केले होते. या नियमावलीत नियम १४ नुसार उच्च शिक्षण संस्थांनी एम.फिल. अभ्यासक्रम न राबवण्याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यानुसार एमफिलचे प्रवेश तातडीने थांबविण्याच्या सूचना यूजीसीने देशातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना दिल्या होत्या.