महाशिवरात्रीपासून हजारो विद्यार्थ्यांची शाळेला दांडी ; शिक्षकही घेतायेत सुट्टीचा आनंद; शिक्षण विभागाची कारवाई

ऐन परीक्षांच्या तोंडावर शाळेला विद्यार्थ्यांविना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. दीड हजार पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत सध्या एकही विद्यार्थी उपस्थित नाही.

महाशिवरात्रीपासून हजारो विद्यार्थ्यांची शाळेला दांडी ; शिक्षकही घेतायेत सुट्टीचा आनंद; शिक्षण विभागाची कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नंदूरबार जिलह्यातील तोरणमाळ (Toranmal) येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी निवासी आंतरराष्ट्रीय शाळा (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee International School) १० ते १२ दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत ओस पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने (Department of Education) मोठा गाजावाजा करुन, कोट्यवधी रुपये खर्च करून शाळा सुरू केली. मात्र, परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थी नसल्याने शाळेला कुलुप लावण्याची वेळ आली. दरम्यान महाशिवरात्री निमित्त या परिसरात मोठी यात्रा भरते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी सुट्टीवर गुल्यानंतर पुन्हा शाळेत आलेच नाही. मात्र,आता विद्यार्थी शाळेत येण्यास सुरूवात झाली असून या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे,असे प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले.

या शाळेत तोरणमाळ खोऱ्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास २० शाळांचे समायोजन त्यासाठी करण्यात आले . महाशिवरात्रीपासून शासनाने कुठलीही सुट्टी जाहीर केली नाही. मग एक हजार ६५० क्षमता असलेल्या या शाळेत १० दिवसांपासून एकही विद्यार्थी उपस्थित कसा नाही ? हा गंभीर प्रश्न यानिमित्ताने पुढे आला. वर्गात शिक्षक असूनही विद्यार्थीच नाहीत, अशी स्थिती या शाळेची झाली होती. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी शाळेला भेट दिल्यानंतर सर्व सावळागोंधळ उघड झाला. त्यामुळे त्यांनी शिक्षकांना वेतनवाढ रोखण्याची तंबी दिली. त्यानंतर शिक्षक आता वाड्या, पाड्यांवर विद्यार्थ्यांची शोधाशोध करत असून त्यांचे पालकच शाळेत पाठवत नसल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे आता पालकांचे प्रबोधन करुन विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे.

मागील १० दिवसांपासून विद्यार्थी नसल्याने शाळेला कुलूप लावल्याचे दिसून आले. विद्यार्थी नसल्याने चार-पाच शिक्षक वगळता इतर शिक्षकही सुट्यांचा आनंद घेत असल्याचे आढळले. तीनही शाळांच्या ३५ पैकी चार ते पाच शिक्षकांची उपस्थिती बरेच काही सांगून जाते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याची दखल घेतली असून, कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.