स्पर्धा परीक्षांच्या भरती नियमांमध्ये बदल

आता कोणत्याही UPSC, RRB,SSC परीक्षेसाठी नोंदणी करताना, उमेदवारांना प्रथम त्यांची आधार पडताळणी करावी लागेल.

स्पर्धा परीक्षांच्या भरती नियमांमध्ये  बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) नंतर आता स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षांसाठी आधार पडताळणी अनिवार्य (Aadhaar Verification Mandatory) करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त काही राज्यांनीही लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी आधार पडताळणी बंधनकारक केले आहे. माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर (Pooja khedkar case) यांच्या वादानंतर अनेक सरकारी नोकऱ्यांसाठीच्या भरती परीक्षांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. 

वास्तविक, पूजा खेडकरवर आरोप आहे की, तिने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने अनेक यूपीएससी प्रवेश परीक्षा दिल्या होत्या. तिने जात प्रमाणपत्र आणि अपंग प्रमाणपत्राच्या आधारे कोट्याचा लाभही घेतला होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांची ठोस ओळख पटवण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वप्रथम, UPSC ने हे अनिवार्य केले होते, परंतु आता इतर अनेक मोठ्या भरतीसाठी देखील आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

पूजा खेडकर वाद सुरू असतानाच केंद्र सरकारने UPSC सर्व भरती परीक्षांसाठीच्या अर्जादरम्यान आधारवर आधारित पडताळणी अनिवार्य केली. आता कोणत्याही UPSC परीक्षेसाठी नोंदणी करताना, उमेदवारांना प्रथम त्यांची आधार पडताळणी करावी लागेल. या कालावधीत, भरतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरही आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. पूजा खेडकरचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भविष्यात अशी फसवणूक होऊ नये यासाठी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

तसेच रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने सर्व परीक्षांसाठी उमेदवारांची आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने (RRB) याबाबत माहिती देणारी एक नोटीस जारी केली होती, ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करताना आधार पडताळणीद्वारे त्यांची ओळख सिद्ध करावी लागेल, मात्र बोर्डाने असेही म्हटले आहे की, रेल्वे बोर्ड तुमचा आधार तपशील कोणत्याही तृतीय पक्षाशी शेअर करणार नाही किंवा कोणालाही देणार नाही. हे केवळ उमेदवाराच्या ओळखीच्या पडताळणीपुरते मर्यादित असेल. 

नुकतेच केंद्र सरकारने स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) परीक्षांसाठी आधार पडताळणी अनिवार्य केली. या अंतर्गत, कोणत्याही एसएससी परीक्षेसाठी नोंदणीसह भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर आधार पडताळणी अनिवार्य असेल. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, SSC ला “एक वेळ नोंदणी” पोर्टलवर नोंदणीच्या वेळी आणि आयोगाच्या परीक्षा/भरती चाचणीच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांच्या ओळखीसाठी आधार पडताळणी करण्याची परवानगी आहे.

राजस्थान लोकसेवा आयोगाने (RPSC) बनावट उमेदवार आणि डमी उमेदवार इत्यादींसारख्या फसवणूक टाळण्यासाठी त्याच्या भरती परीक्षांमध्ये आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. आयोगाला आता आधार कार्डद्वारे उमेदवारांच्या बायोमेट्रिक पडताळणीसाठी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे. आता लेखी परीक्षेशिवाय, उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी समुपदेशन आणि मुलाखतीतही आधार पडताळणी केली जाणार आहे.