काॅपी न करून दिल्याने शिक्षकाला चाकू दाखवून धमकावले

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षेला नुकतीच सुरू झाली आहे. या परीक्षेदरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला चाकू दाखवून धमकावण्यात आल्याचा प्रकार अहिल्यानगर येथे घडला आहे.

काॅपी न करून दिल्याने शिक्षकाला चाकू दाखवून धमकावले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षेला नुकतीच सुरू झाली आहे. या परीक्षेदरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला चाकू दाखवून धमकावण्यात (Teacher threatened with knife) आल्याचा प्रकार अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) येथे घडला आहे. या घटनेचा शिक्षक संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार उद्धव नाईक यांना संबंधित प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचे निवेदन दिले आहे. तसेच गुन्हेगारावर कडक कारवाई करा अन्यथा पेपरवर बहिष्कार टाकू,असा इशाराच शिक्षकांनी दिला आहे. 

राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली आहे. यासाठी परीक्षा केंद्रावर शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक झाली असून कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डाकडून यंदा कडक पाऊल उचलण्यात आले आहे. तरी देखील कॉपी पुरविण्यासाठी बरेच जण बाहेरून प्रयत्न करत असतात. दादागिरी करत कॉपी पुरविली जाते. दरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला धमकावण्याचा प्रकार अहिल्यानगर येथून समोर आला आहे. 

यापूर्वी परभणी जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील उपप्राचार्यांनी हत्यारबंद पोलीस बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, आता या प्रकरणामुळे पर्यवेक्षक आणि केंद्र प्रमुख यांच्या जीवाला खरच धोका असल्याचे समोर येत आहे.  

बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर मंगळवारी झाला असून या पेपराला अहिल्यानगर तालुक्यातील तिसगाव येथे गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने शिक्षकांना चाकूचा धाक दाखवत धमकावत त्यांची गाडी अडवून दमदाटी केली. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटत असनू शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे. त्यातील आरोपीला कठोर कारवाईची मागणी शिक्षकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केले आहे.