मोठी बातमी:रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया झाली सुरू; निवडणूक आयोगाकडून परवानगी

त्या त्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की त्या जिह्यात नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

मोठी बातमी:रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया झाली सुरू; निवडणूक आयोगाकडून परवानगी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (department of school education)पवित्र पोर्टलच्या (Pavitra portal)माध्यमातून राबवल्या जात असलेल्या शिक्षक भरती (teacher recruitment) प्रक्रियेला लोकसभा आचारसंहिता (code of conduct) लागू झाल्यामुळे निर्बंध आले होते.परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission)शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले की,नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्या त्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की त्या जिह्यात नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

पवित्र पोर्टल मार्फत 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्व साधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन /जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. दरम्यान, केेंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले. याविषयीची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केेंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला. यासंदर्भात केेंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे, असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास 19 एप्रिल रोजी प्राप्त झाले आहे.त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे, असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.