परराज्यातील नागरिकांसाठी हिंदी भाषा पहिली पासून शिकवा; पुण्यातील आमदारांची भूमिका

परराज्यातून अनेक गरीब हिंदी भाषिक कामगार हे महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत. त्यांची मुले ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किंवा खासगी विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात.या ठिकाणी हिंदी भाषा शिकवली गेली नाही तर त्यांना अडचण निर्माण होत असल्याने या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकण्याची गरज असते.

परराज्यातील नागरिकांसाठी हिंदी भाषा पहिली पासून शिकवा; पुण्यातील आमदारांची भूमिका

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात बिहार, छत्तीसगड उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यातून हिंदी भाषिक नागरिक (Hindi speaking citizens)मोठ्या संख्येने येतात.त्यांच्या मुलांना हिंदी भाषेतून शिक्षण घेण्याची अडचण होणार नाही, याचा विचार करून इयत्ता पाचवी पासून इयत्ता दहावीपासून हिंदी भाषा (Hindi language from class 5th to class 10th)शिकवावी.एवढेच नाही तर शक्य असेल तर पहिलीपासून हिंदी भाषा शिकवावी,असे मत पुण्यातील वडगावशेरी मतदार संघाचे (Vadgaonseri Constituency) आमदार (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार- गट) बापूसाहेब पठारे (MLA Bapusaheb Pathare) यांनी व्यक्त केले.तसेच इंग्रजी भाषा पहिली (English language first)पासून बंधनकारक केली असेली तरी अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे अपुरे ज्ञान असल्याचे निदर्शनास येते,याकडेही पठारे यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुषंगाने राज्य शासनाने पहिली पासून हिंदी सक्तीने शिकवण्याबाबत अध्यादेश प्रसिध्द केला. मात्र,त्यास सर्व क्षेत्रातून विरोध झाला. त्यानंतर राज्य शासनाने समाजातील सर्व घटकांची मते जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या आधींकक्षतेखाली समिती स्थापना केली. ही समिती सध्या राज्यातील विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधत आहे.गुरूवारी (दि.13 नोव्हेंबर ) पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे सर्वसामान्य नागरिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील संवादाच्या कार्यक्रमात आमदार बापूसाहेब पठारे यांनी भूमिका मांडली. यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील आजी माजी अधिकारी, भाषा अभ्यासक तसेच समितीचे सदस्य डॉ. सदानंद मोरे, डॉ. वामन केंद्रे, डॉ. अपर्णा मॉरिस, डॉ. सोनल कुलकर्णी -जोशी आदी उपस्थित होते.

बापूसाहेब पठारे म्हणाले, राज्यात हिंदी भाषेचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात हिंदी भाषा ऐच्छिक ठेवावी.तर शहरी भागात हिंदी भाषा बंधनकारक ठेवावी.लोकप्रतिनिधी असल्यामुळे मतदार संघात असलेल्या लोकसंख्येचा विचार केला तर परराज्यातून अनेक गरीब हिंदी भाषिक कामगार हे महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत. त्यांची मुले ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किंवा खासगी विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात.या ठिकाणी हिंदी भाषा शिकवली गेली नाही तर त्यांना अडचण निर्माण होत असल्याने या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकण्याची गरज असते.त्यामुळे इयत्ता पाचवी पासून ते दहावीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची करावी. इंग्रजी भाषा पहिलीपासून शिकवण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. मात्र,त्यांची अंमलबजावणी कशी होते. हे तपासले जात नाही. मी स्वत: अनेक शाळांना भेटी देण्यासाठी जातो. त्यावेळी विद्यार्थ्यांना इंग्रजी ज्ञान नसल्याचे निदर्शनास येते.

बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या भूमिकेवर एका अभ्यासकाने आक्षेप घेतला.ते म्हणाले महाराष्ट्रात जर तमिळ नागरिक मोठ्या संख्येने येणार असतील तर सर्व शाळांमध्ये तमिळ भाषा शिकवावी का? एकूणच या संवाद कार्यक्रमात हिंदी भाषा इयत्ता सहावी पासून शिकवावी.आठवीपासून ही भाषा ऐच्छिक असावी, केवळ संवादासाठी हिंदी शिकवावी, मात्र मराठी व हिंदी भाषा ही इयत्ता पहिली पासून शिकवावी, अशी मते अनेक अभ्यासकांनी मांडली.