सिनेट सदस्यच करणार विद्यापीठाविरोधात आंदोलन
विद्यापीठाने सदर परिपत्रक एक आठवड्याच्या आत रद्द न केल्यास विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करणार असल्याचे विद्यापीठाला कळवले आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) प्रशासनाने आंदोलन, सभा आणि कार्यक्रमाबाबत प्रसिध्द केलेल्या परिपत्रकामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विद्यापीठाने प्रसिध्द केलेले पत्रक विद्यार्थ्यांच्या अधिकारावर गदा आणणारे आहे. त्यामुळे विद्यापीठाने आंदोलन, कार्यक्रम, सभा (movement, program, meeting)घेण्याबाबत 8 दिवसांच्या पूर्व परवानगीचे प्रसिद्ध केलेले पत्रक मागे घ्यावे,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यात आता अधिसभा सदस्य डाॅ. हर्ष गायकवाड (Dr. Harsh Gaikwad)यांनीही विद्यापीठाला निवेदन दिले असून परिपत्रक मागे घ्या, अन्यथा आंदोलन केले जाईल,असा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यापीठ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनासाठी परवानगी घेण्याच्या नियमाविरोधात न्यायालयात जाणार
विद्यापीठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलने होत आहेत.तसेच विद्यार्थी संघटना विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसत होते.मात्र,त्यामुळे विद्यापीठ परिसरात हाणामारीच्या घटना घडल्याचे समोर आले होते. परिणामी विद्यापीठाच्या माजी कुलसचिवांनी सुध्दा याबाबत पत्रक काढले होते.आता पुन्हा एकदा आंदोलन, कार्यक्रम आणि सभा यासाठी पूर्व परवनगी घ्यावी लागेल,असे विद्यापीठाने स्पष्ट केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डाॅ. हर्ष गायकवाड म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंदोलनाबाबतचे परिपत्रक क्रं. ३१६/२०२४ हे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी असल्याने ते तात्काळ रद्द करणे बाबतचे निवेदन दिले आहे. तसेच विद्यापीठाने सदर परिपत्रक एक आठवड्याच्या आत रद्द न केल्यास विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करणार असल्याचे विद्यापीठाला कळवले आहे.