राज्य मंडळाकडूनही ओपन बुक एक्झामची चाचपणी ;पुस्तक घेऊन द्या बोर्डाची परीक्षा 

मागील वर्षांच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 32 हजार 189 विद्यार्थी वाढले आहेत.

राज्य मंडळाकडूनही ओपन बुक एक्झामची चाचपणी ;पुस्तक घेऊन द्या बोर्डाची परीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सीबीएसईने ओपन बुक एक्झामच्या (CBSE open book exam) दृष्टीने तयारी केली असून काही शाळांमध्ये त्या पध्दतीने परीक्षा घेण्याचा प्रस्ताव काही शाळांना पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (state board) सुद्धा निश्चितपणे बोर्डाच्या परीक्षेसाठी ओपन बुक एक्झामचा (Open book exam for board exam) विचार केला जाईल. तसेच त्यासंदर्भात काही शाळांमध्ये परीक्षा घेऊन त्यास मिळणारा प्रतिसाद व विद्यार्थी पेपर कसे लिहितात, याबाबत चाचपणी करण्यात येईल,असे  राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (State Board President Sharad Gosavi) यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना सांगितली. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता दहावीची परीक्षा (दि.१) शुक्रवारपासून सुरू होत असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शरद  गोसावी बोलत होते.या वेळी राज्य मंडळाचे सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

गोसावी म्हणाले, राज्य मंडळातर्फे 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 16 लाख 945 एवढी असून त्यात ८ लाख 59 हजार 478 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 911 विद्यार्थिनींचा समावेश आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 32 हजार 189 विद्यार्थी वाढले आहेत.यावर्षी 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे संख्या 6 हजार 177 एवढी असेल पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी संख्या 8 हजार 156 एवढी आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश घेऊन सीबीएसई बोर्डाच्या शाळेतून इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नववी दहावीला राज्य मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यामुळे सुद्धा ही संख्या वाढत आहे.लोकसभा निवडणूका लागल्या तरीही त्याचा पेपर तपासाणी किंवा परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही. 

राज्य मंडळातर्फे प्रसिद्ध व‌ छपाई केलेले वेळापत्रकच विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरावे. इतर संस्थेने किंवा यंत्रणेने छापलेल्या वेळापत्रक ग्राह्य धरू नये,असे नमूद करून गोसावी म्हणाले,परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई केली जात आहे.गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तब्बल 400 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.तसेच  विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात काही अडचणी आल्यास विभागीय मंडळाच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळातर्फे करण्यात आले.