सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'ललित पौर्णिमा उत्सव'

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'ललित पौर्णिमा उत्सव'

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही येत्या २५ नोव्हेंबर रोजी त्रिपूरी पौर्णिमेनिमित्त 'ललित पौर्णिमा' उत्सवाचे (Lalit Purnima Utsav)आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे पुण्यातील रसिक प्रेक्षकांना त्रिपूरी पौर्णिमेनिमित्त खास मेजवानी मिळणार आहे. शनिवारी रात्री ९.३० वाजता सुरू होणारा हा उत्सव रविवार सकाळी ७ पर्यंत चालणार आहे.

 या उत्सवात केंद्राचे माजी विद्यार्थी रात्रभर संगीत व  नाटकाचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्धाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर करणार असून याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रविण भोळे आदी उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी केंद्राच्या विविध कार्यक्रमाचे ध्वनीचित्रमुद्रीत केलेले डिजीटल दस्तावेजीकरण सर्व सामान्यांसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी बनविण्यात आलेल्या 'पाडा -परफॉर्मिंग आर्ट्स डिजीटल अर्काईव्ह' या वेबसाईटचे उद्धाटनही  प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे.  

गेल्या ३ वर्षापासून ललित कला केंद्र त्रिपूरी पौर्णिमेनिमित्त या उत्सवाचे आयोजन करत असून यात केंद्राचे माजी विद्यार्थी कलाप्रदर्शन करत असतात. या कार्यक्रमात प्राची वैद्य यांचे 'आदिम गीत कथा', ऋतुजा सोमण यांचे 'कथक नृत्य', डॉ. रुचिरा केदार यांचे 'ठुमरी व दादरा गायन', रुचिरा खोत यांचे 'द्रौपदी', शुभम साठे यांचे 'मेड इन इंडिया', जान्हवी मराठे यांचे 'जो आहा सो आहा' ही एकपात्री सादरीकरणे, संकेत खेडकर यांचा 'मुकाभिनय' व काही नृत्य संरचना व सांगीतिक रचना सादर केल्या जाणार आहेत. ललित कला केंद्राच्या आवारात होणाऱ्या या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या सादरीकरणाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

------------