शिक्षण घेतानाच 'इंटर्नशिप' संधी, ५०० कंपन्याची विद्यापीठाकडे नोंदणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्योग, व्यवसाय, सहकारी संस्था, एनजीओ अशा सर्व संस्थांमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध स्वरूपाच्या इंटर्नशिप उपलब्ध करून देण्याच्या हेतूने इंटर्नशिप पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे.  

शिक्षण घेतानाच 'इंटर्नशिप' संधी, ५०० कंपन्याची विद्यापीठाकडे नोंदणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना इंटर्नशिप कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) उद्योग, व्यवसाय, सहकारी संस्था, एनजीओ अशा सर्व संस्थांमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध स्वरूपाच्या इंटर्नशिप उपलब्ध करून देण्याच्या हेतूने इंटर्नशिप पोर्टलची (Internship Portal) स्थापना करण्यात आली आहे.  या पोर्टलवर पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील तब्बल पाचशे कंपन्या, संस्था, बँका आदींनी नोंदणी (Registration of five hundred companies, institutions, banks) केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करत असतानाच इंटर्नशिप पूर्ण करता येणार आहे. 

विद्यापीठाने विविध औद्योगिक वसाहती, कंपन्या, संस्था पत्र लिहिली होती. तसेच वैयक्तिक ई-मेलद्वारे संपर्क साधला होता. त्यामध्ये सी.ए. सी.एस. तसेच लॉ फर्म, टॅक्स प्रॅक्टीसनर, एमआयडीसी, औद्योगिक संघटना, माध्यम संस्था, एनजीओ, मोठे उद्योगसमूह नागरी, सहकारी तसेच ग्रामीण बँका, पुस्तक प्रकाशन संस्था आदींचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून पाचशे संस्था, कंपन्यांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. तसेच महाविद्यालयांच्या नोडल ऑफिसर मार्फतही विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी केली जात आहे.

पुणे विद्यापीठाने फेब्रुवारी २०२४ मध्ये https://sppuinternship.unipune.ac.in/ हे इंटर्नशिप पोर्टल सुरू केले आहे. पोर्टलच्या माध्यमातून विद्यापीठ परिक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क त्यांच्या महाविद्यालय, तसेच घराजवळील संस्था, उद्योग बँकांमध्ये इंटर्नशिपची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध अभ्यासक्रमामध्ये 'इंटर्नशिप', 'ऑन द जाॅब ट्रेनिंग' अशा विविध नवीन संकल्पनांचा समावेश केला आहे. तसेच त्याला क्रेडिट्स देखील दिले जाणार आहेत.