सावधान : NCERT ची बनावट पाठयापुस्तक बाजारात विक्रीला ; दिल्लीत मोठी कारवाई , विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर होतोय परिणाम

दिल्ली येथील सदर बाजार येथील दुकानांवरील छापेमारीत ही बाब उघड झाली आहे.

सावधान :  NCERT ची बनावट पाठयापुस्तक बाजारात विक्रीला ; दिल्लीत मोठी कारवाई , विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर होतोय परिणाम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशभरात CBSC च्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. बहुतेक पालकांनी नवीन पुस्तकांची खरेदी केली आहे. अशा परिस्थितीत एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ( NCERT) ची बनावट पुस्तके बाजारात रजरोसपणे विकली जात आहेत. भीतीदायक बाब म्हणजे ही पुस्तके बनवण्यासाठी वापरली गेलेली शाई आणि कागदांमुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.

दिल्ली येथील सदर बाजार येथील दुकानांवरील छापेमारीत ही बाब उघड झाली आहे. NCERT च्या माहितीनुसार फ्लाइंग स्क्वॉडचे डीएसपी इंद्रजित सिंग यांना एनसीईआरटीच्या नावाने बनावट पुस्तके शहरात विद्यार्थ्यांना विकली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी सीएम फ्लाइंग स्क्वॉडच्या पथकाने शिक्षण विभागाच्या मदतीने सदर बझारच्या आसपासच्या 7 पुस्तकांच्या स्टॉलवर छापा टाकला. पथकाच्या छाप्याची माहिती मिळताच उर्वरित दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून पळ काढला. 

छाप्यादरम्यान पथकाने मोठ्या प्रमाणात बनावट पुस्तके जप्त केली. ही बनावट पुस्तके छापण्यासाठी निकृष्ट दर्जाचा कागद आणि शाई वापरण्यात आली आहे. ही बनावट पुस्तके विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी घातक आहेत, असा इशारा NCERT  कडून देण्यात आला आहे. 

सीएम फ्लाइंग स्क्वॉडच्या प्रवक्त्याने सांगितले की, रात्री उशिरापर्यंत छापेमारीची कारवाई सुरू होती. आरोपी दुकान चालकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येत आहे. दुकाने बंद करून पळून जाणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.