बेरोजगारांची वारी, मुख्यमंत्र्यांच्या दारी ; प्राध्यापक भरतीसाठी बेमुदत आंदोलन

नेट, सेट, पीएच. डी. पीएचडी धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून दे धडक बेधडक..., 'उच्चशिक्षित बेरोजगारांची वारी, मुख्यमंत्र्यांच्या दारी'...अशा घोषणा येत्या 7 एप्रिल पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन केले जाणार आहे.

बेरोजगारांची वारी, मुख्यमंत्र्यांच्या दारी ; प्राध्यापक भरतीसाठी बेमुदत आंदोलन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP)अंमलबजावणीला सुरुवात झाली असली तरी अजूनही महाविद्यालयांमध्ये पूर्ण प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे एनईपी अंमलबजावणी (Implementation of NEP)करणे, अडचणीचे ठरत आहे. त्यातच प्राध्यापकांची रिक्त पदे (Professor vacancies)भरण्याबाबत वेळोवेळी विविध संघटनांकडून आंदोलने केली जात आहे. येत्या 7 एप्रिल पासून नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या (NET-SET PhD Holders Struggle Committee)माध्यमातून येत्या ७ एप्रिल रोजी 'बेरोजगारांची वारी, मुख्यमंत्र्यांच्या दारी'... हे सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे.

राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या आदेशामुळे स्थगित झाली होते. नुकतीच याबाबतची स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांची पदे भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे, असे असले तरी राज्यातील विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने अनेक वेळा प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत आदेश दिले आहेत. परंतु, त्यावर अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे नेट, सेट, पीएच. डी. पीएचडी धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून दे धडक बेधडक..., 'उच्चशिक्षित बेरोजगारांची वारी, मुख्यमंत्र्यांच्या दारी'...अशा घोषणा येत्या 7 एप्रिल पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन केले जाणार आहे.

केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करावी, केंद्रशासन व यूजीसीच्या निर्देशानुसार तासिका तत्त्वावरील पद्धत कायम बंद करून समान काम समान वेतन यानुसार वर्षभराच्या नियुक्तीसह प्राध्यापकांना दरमहा 84 हजार रुपये वेतन द्यावे, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करावी., 24 नव्हेंबर 2021 पूर्वीच्या मान्यताप्राप्त 78 महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100% भरती करण्यात यावी, या मागण्यांसाठी नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीतर्फे बेमुदत आंदोलन केले जाणार आहे.