मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणातून विद्यापीठाने अनुशेष भरून काढला : डॉ. सदानंद मोरे 

विद्यापीठाने मराठीसाठी कार्य करण्याचा अनुशेष मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणातून भरून काढला आहे.

मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणातून विद्यापीठाने अनुशेष भरून काढला : डॉ. सदानंद मोरे 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे नाही पण मराठीसाठी कार्य करणारे वि‌द्यापीठ स्थापन व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)रूपाने ती प्रत्यक्षातही आली.मात्र, कालानुरूप विद्यापीठाची ध्येयधोरणे बदलली आणि मराठीसाठी रचनात्मक कार्य करण्याचे सातत्याने राहून गेले.परंतु, आज विद्यापीठाने मराठीसाठी कार्य करण्याचा अनुशेष मराठी भाषा भवनाच्या (Marathi bhasha bhavan)पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणातून भरून काढला आहे, असे प्रतिपादन  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे (Dr. Sadanand More)यांनी केले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले आले. याप्रसंगी प्रा.डॉ. सदानंद मोरे बोलत होते.कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे प्रमुख पाहूणे होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे,विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्वरी मंठाळकर, डॉ.डी.बी.पवार तसेच  अधिसभा सदस्य व विविध अधिकार मंडळाचे सदस्य,  भाषा व साहित्य प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांच्यासह विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सदानंद मोरे म्हणाले,मराठी भाषा भवन हा सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे पहिल्या टप्प्यातील लोकार्पण हे तितकेच महत्त्वाचे आणि ऐतिहासिक आहे. टप्प्याटप्प्याने इमारत व प्रकल्प पूर्ण होईल. पण आहे त्या परिस्थितीत मराठीसाठी कार्य करण्याची जबाबदारी सर्वांनी ओळखली आहे, यांचा मनस्वी आनंदही होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची निर्मिती ही महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या इतिहासातीलच एक महत्त्वाची घटना असल्याचे प्रतिपादन डॉ पंडित विद्यासागर यांनी केले.तसेच मराठी भाषेवर भविष्यात व नजीकच्या काळात आलेल्या संकटाची परिस्थिती स्पष्ट केली.

-------------------------------------------------------------

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राज्यभाषांना महत्व देण्यात आल्याने मराठी भाषा भवनाचे महत्व आणखी वाढणार आहे. वि‌द्यापीठ अनुदान आयोगाने स्थानिक भाषांचा प्रसार व प्रचार होण्यासाठी मानवविज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि आंतरविद्याशाखेतील   बहुतांश विषयातील १५० पुस्तके मराठीत लिहण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाला दिली आहे. सध्या महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरात ही राज्ये ह्या संदर्भात आघाडीवर आहेत. यादृष्टीने या मराठी भाषा भवनाला भविष्यात खूप काम करायचे आहे. वि‌द्यापीठाने मराठी भाषा भवन निर्मितीच्या आणि लोकार्पणाच्या ह्या पहिल्या टप्प्यावर अत्यंत विश्वासाने कामाला सुरुवात केली आहे. 
- प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

-------------------------------------

मराठी भाषा भवनात काय काम चालणार : 

मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून पुढील काळात मराठी भाषा व साहित्य अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, अध्यापन पद्धती विकास व प्रशिक्षण, भाषा व बोली भाषाभ्यास, भाषेचा कालिक अभ्यास, संस्कृती अभ्यास, अनुवाद अभ्यास, उपयोजित भाषाभ्यास व व्यवहार, शासकीय व्यावसायिक वा रोजच्या व्यवहारातील मराठी, साहित्य व इतर कला अभ्यास, ज्ञानभाषा निर्मिती प्रकल्प, भाषा प्रमाणीकरण, संशोधन आणि प्रशिक्षण, माहिती-तंत्रज्ञान अभ्यास, अमराठी भाषकांसाठी मराठीचे अध्यापन व प्रशिक्षण लोकसाहित्याभ्यास, तौलनिक भाषाभ्यास आणि साहित्या अभ्यास तसेच बालसाहित्य ह्या संधर्भात पायाभूत शैक्षणिक व संशोधनपर कार्य करण्याचे नियोजन आहे. 

------------------------