पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council)घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल (Result of 5th and 8th Scholarship Examination)जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळा भेट देऊन आपला बैठक क्रमांक टाकून निकाल पाहता येईल, असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद उपायुक्त अश्विनी भारुड यांनी  प्रसिद्ध केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी ), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल ३० एप्रिल २०२४ रोजी www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये येत्या10  मेपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी येत्या 10 मे पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 

दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.